कोल्हापूर : शस्त्र तस्करीप्रकरणी दोघांना बेड्या | पुढारी

कोल्हापूर : शस्त्र तस्करीप्रकरणी दोघांना बेड्या

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : घातक शस्त्रांची तस्करी करणार्‍या पोलिस रेकॉर्डवरील दोन सराईतांना बेड्या ठोकून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सव्वा लाख रुपये किमतीची गावठी बनावटीचे दोन पिस्टल व जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. संशयित जमीर मकतूम बेपारी ( वय 36, रा. कुंभार चाळ, गल्ली क्रमांक 3 विक्रमनगर, कोल्हापूर ) व रोहित सुरेश वाघमारे ( 29, मंगेश्वर कॉलनी, उचगाव, ता. करवीर) अशी त्यांची नावे आहेत.

कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात शस्त्र तस्करी होत असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांना मिळाल्याने त्यांनी शस्त्र तस्कराविरोधी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषणमार्फत 15 जानेवारी ते 29 जानेवारी या काळात शोधमोहीम राबविण्यात आली.

पोलिस रेकॉर्डवरील संशयित जमीर बेपारी, रोहित वाघमारे शस्त्र तस्करी करीत असल्याची माहिती मिळताच दोघांना ताब्यात घेण्यात आले. अंगझडतीसह त्याच्या घराचीही तपासणी करण्यात आली. झडतीत दोन गावठी पिस्टल, 1 मॅग्झीन, 9 जिवंत काडतुसे असा साठा मिळून आला. संशयितांविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमीर बेपारीविरुद्ध यापूर्वी बेकायदा शस्त्रे कब्जात बाळगणे, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, तर वाघमारे याच्यावर बलात्कारासह गंभीर दुखापतीचे गुन्हे दाखल असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button