समरजितसिंह घाटगे यांनी केली कागलच्या श्रीराम मंदिरात महाआरती | पुढारी

समरजितसिंह घाटगे यांनी केली कागलच्या श्रीराम मंदिरात महाआरती

कागल, पुढारी वृत्तसेवा : अयोध्येतील श्रीराम मंदिरामध्ये मूर्ती प्रतिष्ठापनेच्या आनंद उत्सवाप्रित्यर्थ येथील श्रीराम मंदिर येथे शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी हजारो राम भक्तांच्या उपस्थितीत महाआरती केली. यावेळी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

सकाळपासूनच राम भक्तांनी प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी रीघ लावली होती. दिवसभर ‘श्रीराम जय राम जय जय राम’ असा जप करण्यात आला. या ठिकाणी प्रभू श्रीरामांच्या स्तुतीपर भजनांचे भजनी मंडळासह श्रीमंत जयसिंगराव घाटगे विद्या मंदिरच्या बाल कलाकारांनी सादरीकरण केले. भाविकांना प्रसाद वाटप केले. आकर्षक विद्युत रोषाणाईमुळे संपूर्ण मंदिर उजळून निघाले होते.

यावेळी शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे, नंदितादेवी घाटगे, श्रेयादेवी घाटगे, आर्यवीर घाटगे, प्रवचनकार कांचनताई धनाले यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नेपाळसह परप्रांतीय राम भक्तांनी घेतले दर्शन..

येथील प्रभू श्रीराम मंदिरामध्ये दर्शनासाठी स्थानिक नागरिकांनी तर गर्दी केली होतीच, शिवाय नेपाळमधील एक दाम्पत्य या ठिकाणी दर्शनासाठी आले होते. तसेच बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक राज्यातील परप्रांतीय नागरिकांनीही दर्शन घेतले.

Back to top button