श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली! | पुढारी

श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली!

पी. ए. पाटील

कोल्हापूर : ‘फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूंनी भिजली… श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली…’ कोल्हापूरचे प्रसिद्ध गीतकार जगदीश खेबूडकर यांनी पाच दशकांपूर्वी लिहिलेले हे गीत… अयोध्या येथे आज होणार्‍या राम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर या गीताच्या आठवणी तमाम मराठी रसिकांमध्ये जाग्या झाल्या आहेत.

गीतकार खेबूडकर यांनी आपण हयात असो वा नसो; पण राम मंदिरावरील आपले गाणे अजरामर राहिले पाहिजे, असा संकल्पच जणू त्यांनी हे गीत लिहिताना केला असावा. आज पुन्हा हे गीत राम भक्तांच्या ओठांवर आले आहे.

फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूंनी भिजली,
श्रीरामाच्या पूजेसाठी आज
अयोध्या सजली,
गुढ्या पताका तोरण साजे
रूपे घेती अवयव माझे
अभंग नौबत कंठामधुनी
दाही दिशा गाजली
हृदय म्हणू की हे सिंहासन
बसा रघुवरा घेते दर्शन
स्पर्शसुखाने अवघी काया
थरथरली लाजली
पंचप्राण हे लावुन ज्योती
सर्वांगाने करीन आरती
भक्तिभाव ही टाळमंजिरी,
तालावर वाजली
सर्वस्वाच्या नैवेद्याने
एकरूप हो दोन जीवने
तुझ्या कृपेची अमृतवेली,

मनोमनी रुजली

खेबुडकर यांनी 6 एप्रिल 1972 रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘पाच नाजूक बोटे’ या चित्रपटासाठी हे गाणे लिहिले होते. खेबूडकर यांची देवावर प्रचंड श्रद्धा होती. यामुळेच त्यांनी आजवर अनेक चित्रपटांसाठी शेकडो भक्तिपर गीते लिहिली आहेत. ‘अष्टविनायका तुझा महिमा कसा’ हे सर्वांच्या मुखी असलेले हे गीत त्यांनीच लिहिलेले. या गाण्याबद्दल विशेष गोष्ट म्हणजे एकाही अष्टविनायकाच्या दर्शनाला न जाता खेबूडकरांनी आठ गणपती मंदिरांची महती हुबेहूब मांडली आहे. लावणी, भारूड, पोवाडा, गोंधळ, वाघ्यामुरळी, वासूदेव अशा मराठी लोकगीतांच्या संपन्न वारशातून या गाण्याचे प्रत्येक कडवे सजले आहे. त्यामुळे अष्टविनायकाचा महिमा अधिकच श्रवणीय झाला आहे.

‘फुले प्रीतीची आनंदाच्या अश्रूंनी भिजली… श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली…’ या गीताला दत्ता डावजेकर यांनी संगीत दिले आहे, तर आशा भोसले यांनी हे गीत गायिले आहे. 22 जानेवारी हा रामलल्ला प्रतिष्ठापनेचा दिवस देशभरातील श्रीराम भक्तांसाठी अपूर्व प्रसंग असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर खेबूडकर यांनी लिहिलेल्या गाण्याची आठवण मराठी रसिकांना होत आहे. या गाण्याचा इतिहास समाजमाध्यमांतून जाणून घेताना नेटकरी दिसत आहेत.

Back to top button