आजपासून आठ एक्स्प्रेस रद्द; ‘तिरुपती’ बेळगावमधून, ‘महाराष्ट्र’ पुण्यातून सुटणार | पुढारी

आजपासून आठ एक्स्प्रेस रद्द; ‘तिरुपती’ बेळगावमधून, ‘महाराष्ट्र’ पुण्यातून सुटणार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मिरज रेल्वे स्थानकात यार्ड नूतनीकरण व दुहेरीकरणाच्या कामासाठी आलेल्या मेगा ब्लॉकचा मोठा परिणाम कोल्हापूर-मिरज मार्गावरील रेल्वे सेवेवर होणार आहे. या कामासाठी आठ एक्स्प्रेस 26 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस बेळगावमधून तर कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यामधून सुटणार आहेत.

सुट्ट्यांचा कालावधी असताना कोल्हापुरातून सुटणार्‍या गाड्या रद्द केल्याने तसेच काही गाड्यांचे मार्ग वळवण्यात आल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होणार आहेत. सुट्टीच्या कालावधीनुसार दोन-तीन महिने आगाऊ आरक्षण केलेल्यांच्या नियोजनावर पाणी पडणार आहे. तिरुपतीला जाणार्‍या तसेच तिरुपतीवरून येणार्‍या, महाराष्ट्र एक्स्प्रेसने प्रवास करणार्‍या प्रवाशांना प्रवासच रद्द करावा लागणार आहे. अन्यथा आर्थिक व वेळेचा भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

रद्द झालेल्या गाड्या

कोल्हापूर-पुणे व पुणे-कोल्हापूर एक्स्प्रेस, कोल्हापूर-कलबुर्गी व कलाबुर्गी-कोल्हापूर सुपरफास्ट एक्स्प्रेस 26 डिसेंबर ते 6 जानेवारी पर्यंत, कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस 29 डिसेंबर,1 व 5 जानेवारी या दिवशी तर नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस 30 डिसेंबर, 2 व 6 जानेवारी या दिवशी रद्द करण्यात आली आहे. कोल्हापूर-धनबाद एक्स्प्रेस 29 डिसेंबर व 5 जानेवारी तर धनबाद-कोल्हापूर 1 जानेवारी रोजी रद्द केली आहे.

महाराष्ट्र एक्स्प्रेस पुण्यातून सुटणार

कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस 26 डिसेंबर ते 6 जानेवारीपर्यंत पुण्यातून सुटणार आहे. तसेच गोंदियावरून कोल्हापूरला येणारी महाराष्ट्र एक्स्प्रेस 5 जानेवारी पर्यंत पुण्यापर्यंत येणार आहे.

तिरुपती बेळगावमधून सुटणार

कोल्हापूर-तिरुपती हरिप्रिया एक्स्प्रेस मंगळवार (दि. 26)पासून 6 जानेवारीपर्यंत बेळगाव येथून सुटणार आहे तर तिरुपतीहून सुटलेली ही गाडी 5 जानेवारीपर्यंत बेळगावपर्यंतच येणार आहे. बुधवारी (दि. 27) कोल्हापुरात येणारी नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस आणि धनबाद-कोल्हापूर एक्स्प्रेस कुर्डूवाडीपर्यंतच येणार आहे.

Back to top button