शिवाजी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ | पुढारी

शिवाजी विद्यापीठाचा आज दीक्षांत समारंभ

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाचा 60 वा हीरकमहोत्सवी दीक्षांत समारंभ आज (सोमवारी) सकाळी 11.30 वाजता विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात होणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. मंथा प्रमुख पाहुणे असणार आहेत. राज्यपाल रमेश बैस अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. दीक्षांत समारंभात 49 हजार 438 पदव्या प्रदान करण्यात येणार आहेत.

दीक्षांत समारंभात एम.ए. (मास. कॉम.) अधिविभागाची विद्यार्थिनी साईसिमरन घाशी (मूळ गाव बत्तीस शिराळा, जि. सांगली) हिला 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठीचे राष्ट्रपती सुवर्णपदक तर जयसिंगपूर कॉलेज, जयसिंगपूरची विद्यार्थिनी बिल्कीस गवंडी (मु.पो. आगर, ता. शिरोळ) हिला कुलपती सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.

दरम्यान, रविवारी सायंकाळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांनी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी समारंभस्थळी जाऊन सर्व तयारीचा आढावा घेतला. संबंधित अधिकारी, समिती प्रमुखांना कार्यक्रम सुनियोजितरीत्या पार पडण्यासाठी सूचना केल्या.

पोलिस प्रशासनानेही संपूर्ण परिसराची बारकाईने तपासणी केली. दुपारपासूनच समारंभस्थळासह विद्यापीठ परिसरात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

स्नातकांना पदवी वितरणासाठी 33 बूथ

दीक्षांत मिरवणुकीसाठी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहापासून मुख्य इमारतीपर्यंत भव्य स्वागत कमान उभारली आहे. प्रत्यक्ष उपस्थित राहून पदवी प्रमाणपत्रे स्वीकारणार्‍या स्नातकांना पदवी वितरणासाठी परीक्षा भवन क्रमांक 2 च्या प्रांगणात मंडप घालून 33 बूथ उभारले आहेत. प्रत्येक बूथवर 300 पदवी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येईल. नोंदणीकृत स्नातकांना त्यांच्या पदवीच्या बूथविषयीची माहिती एसएमएसद्वारे कळविण्यात आली आहे. त्याखेरीज विद्यापीठ परिसरात सहा ठिकाणी क्यूआर कोडचीही व्यवस्था केली. ते स्कॅन करून स्नातकाने त्याचा मोबाईल क्रमांक अथवा पीआरएन क्रमांक टाकल्यानंतर त्याला त्याचा दीक्षांत क्रमांक तसेच बूथ क्रमांक समजणार आहे.

Back to top button