दिवाळी पाडवा खरेदीसाठी कोल्हापूर बाजारपेठ सज्ज | पुढारी

दिवाळी पाडवा खरेदीसाठी कोल्हापूर बाजारपेठ सज्ज

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानली जाणारी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा. मुहूर्तावरील खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज असून, अनेक ग्राहकांनी दिवाळी पाडव्या दिवशी विविध वस्तू खरेदीसाठी तयारी केली आहे.

वाहन, सोने, बांधकाम-मालमत्ता, गृहोपयोगी वस्तू, सायकल, कपडे आदींच्या खरेदीवर व्यापारी, व्यावसायिकांनी विविध सवलतींचा धमाका जाहीर केला आहे. पाडवा, भाऊबीज या दिवशी बाजारपेठांत मोठी उलाढाल होण्याची अपेक्षा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने खरेदीची परंपरा राखत ग्राहकांंनी शहरातील सराफी पेढ्यांमध्ये गर्दी केली. धनत्रयोदशीला सोन्या, चांदीची नाणी, देवदेवतांच्या मूर्ती खरेदी केल्या. ग्र्राहकांना आता दिवाळी पाडव्याचे वेध लागले आहेत.

पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्याचे दागिने खरेदी करून गृहलक्ष्मीला भेट दिली जाते. सोन्याचे दागिने घडवण्यासाठी कोल्हापुरातील प्रसिद्ध गुजरी बाजारपेठ, तसेच शहरातील इतर शोरुम्सनी पाडव्याची जोरदार तयारी केली आहे. त्यांनी दागिने घडणावळीवर सवलत जाहीर केली आहे.

एक्स्चेंज बोनस, मोफत विमा, कमी डाऊन पेमेंट, सोन्या-चांदीचे नाणे भेट, अशा सवलतींसह दुचाकी, चारचाकी, व्यावसायिक वाहनांनी बाजारपेठ सजली आहे. सध्या एसयूव्हीची बाजारात चलती असून, बहुतांश गाड्या आगाऊ बुकिंग करूनच वितरित होत आहेत. शहरातील 16 कार उत्पादकांच्या शोरुम्समध्ये सुमारे 1,000 गाड्यांचे वितरण पाडव्याच्या मुहूर्तावर होईल. तसेच उपलब्ध असलेल्या मॉडेल्सची स्पॉट विक्रीदेखील होण्याची शक्यता आहे. अडीच ते तीन हजार दुचाकींचे वितरण होण्याची शक्यता आहे. वाहन विक्रीचा सर्वात मोठा दिवस असलेल्या दिवाळी पाडव्याची तयारी शोरुम्सनी केली आहे. अनेकांनी तुतारीवादक, तसेच सनई-चौघडे अशा वाद्यवृंदाला पाचारण केले असून, मंगलमय वातावरणात गाड्यांचे वितरण होणार आहे.

पाडव्याच्या मुहूर्तावर बांधकाम, रिअल इस्टेट क्षेत्रात चांगल्या उलाढालीची अपेक्षा आहे. नोंदणी शुल्कात सूट, फर्निचर मोफत, ताबा मिळेपर्यंत व्याजात सूट, अशा सवलती बांधकाम व्यावसायिकांनी दिल्या आहेत. नव्याने बुकिंगसह तयार घरांचा ताबा घेण्यासाठी अनेक जण पाडव्याचा मुहूर्त साधणार आहेत.

स्मार्ट टी.व्ही., एलईडी, होम थिएटर, साऊंड बार, फ्रिज, वॉशिंग मशिन, आटाचक्की, सायकल, शिलाई मशिन आदी गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीला चांगला प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. शिवाजी रोड, टेंबे रोड, शाहूपुरी आदी परिसरातील या गृहोपयोगी वस्तूंच्या शोरुम्स सजल्या आहेत. स्मार्टफोन विक्रीदेखील जोरदार होण्याचे संकेत आहेत. स्मार्टफोन्सच्या शोरुम्समध्ये झीरो डाऊन पेमेंट, अ‍ॅक्सेसरीज मोफत, हप्त्यांवर खरेदी, हमखास भेटवस्तू, अशा योजना जाहीर झाल्या आहेत.

Back to top button