‘गोडसाखर’चे धुराडे पेटणार तरी कधी? | पुढारी

‘गोडसाखर’चे धुराडे पेटणार तरी कधी?

प्रवीण आजगेकर

गडहिंग्लज : गेल्यावर्षी ना. हसन मुश्रीफ यांनी गोडसाखर कारखान्याच्या तमाम सभासदांना आपण ‘गोडसाखर’ सुरू करण्यामध्ये कुठेच कमी पडणार नाही, अशी ग्वाही देत कारखान्याची सत्ता खेचून आणली खरी; मात्र मुश्रीफांनी जवळपास 55 कोटी रुपये देऊनही अद्याप ‘गोडसाखर’चे धुराडे पेटणार कधी? गळीत हंगामाच्या तारखेबाबत संचालकांच्यामध्येच संभ्रमावस्था असून स्वाभिमानीचे आंदोलन नसते, तर कार्यक्षेत्रातील ऊस निम्मा तुटला असता. मग, ‘गोडसाखर’ची अवस्था पूर्वीपेक्षा वाईट झाली असती, अशी चर्चा सध्या उत्पादकांमध्ये असून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावर आता अधिकारवाणीने यावर निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत सभासदांमधून व्यक्त होत आहे.

आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचा मागील हंगाम हा सत्ताधार्‍यांनी वेळेचे कारण सांगून घेतला नाही. वस्तुस्थितीही योग्यच असल्याने सभासदांनीही गतवर्षी कारखाना सुरू करण्याची अपेक्षा धरली नव्हती. गेल्यावर्षीपासून ‘गोडसाखर’ कधी सुरू होणार, याकडे उत्पादक लक्ष लावून बसला आहे. निवडणुकीच्या भाषणांमध्ये ना. मुश्रीफ यांनी ‘गोडसाखर’ला जिल्हा बँकेच्या माध्यमातून मदत करणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे त्यांनी जवळपास 55 कोटींचे कर्ज उपलब्ध करून देऊनही अद्याप ‘गोडसाखर’चे धुराडे पेटण्याबाबत समस्याच दिसत आहेत.

कारखान्याच्या संचालकांना गळीत हंगामाची तारीखही निश्चितपणे सांगता येत नसल्याने नेमका कारखाना सुरू तरी कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. दोन एमडींचे राजीनामे झाल्याने कारखान्याच्या कामात दिरंगाई झालीच आहे; मात्र योग्य पद्धतीने नियोजन झाले नसल्यानेच तसेच संचालक मंडळामध्येही एकमत नसल्यानेच ‘गोडसाखर’ सुरू होण्यास दिरंगाई होत असल्याची चर्चा जोरात आहे. कारखान्यातील कामाचे टेंडर असो अथवा अन्य विविध कामांवरून काही संचालकांनी नाराजी व्यक्त करत भीतीही व्यक्त केली असून आता मंत्री मुश्रीफांनाच यामध्ये लक्ष घालून अधिकारावाणीने व त्यांच्या शब्दाला उत्पादकांना दिलेल्या न्यायासाठी बोललेच पाहिजे, अशी स्थिती आहे.

टोळ्या अन्यत्र जाण्याच्या तयारीत

गोडसाखर कारखान्याने 12 कोटी रुपये अ‍ॅडव्हान्स देऊन टोळ्या जमा केल्या असल्या, तरी हाताला काम नसल्याने अन्य कारखान्यांकडे या टोळ्या हस्तांतर करण्याचीही परिस्थिती कारखान्यावर आल्याचे दिसून येत आहे. असे झाले तर कर्नाटकातील कारखाने मुळातच कार्यक्षेत्रातील ऊस हा कारखाना सुरू होण्यापूर्वी संपवतील. आता टोळ्या गेल्या, तर मग गोडसाखर कारखान्याचा ऊस कोण तोडणार, हा प्रश्नच आहे.

Back to top button