दोन हजारांच्या 97 टक्के नोटा जमा! | पुढारी

दोन हजारांच्या 97 टक्के नोटा जमा!

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून दोन हजार रुपयांच्या नोटा माघारी घेण्याविषयी दिलेल्या मुदतीअखेर बँकेमध्ये सुमारे 97 टक्के नोटा जमा झाल्या आहेत. रिझर्व्ह बँकेने एका पत्रकाद्वारे नुकतीच ही माहिती दिली आहे. आता बाजारामध्ये 31 ऑक्टोबरअखेर 10 हजार कोटी रुपये मूल्यांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा माघारी घेणे शिल्लक आहेत. या नोटांची बदलून घेण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे, असे या पत्रकात म्हटले आहे.

काळ्या पैशाला लगाम बसण्यासाठी कमीत कमी चलनी मूल्यांच्या नोटा व्यवहारात ठेवणे हा निकष जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये लावण्यात येत आहे. भारत सरकारने 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून बंद होण्याच्या सूचना देत, नागरिकांना त्यांच्याजवळ असलेल्या नोटा परत करण्यासाठी मुदत दिली होती. त्यावेळी बाजारामध्ये 3 लाख 56 हजार कोटी रुपये मूल्यांच्या दोन हजार रुपयांच्या नोटा उपलब्ध होत्या.

रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर नागरिकांनी या नोटा जमा करून त्याऐवजी अन्य चलनी नोटा बदलून घेण्यासाठी बँकांमध्ये रांगा लावल्या होत्या. भारतीय रिझर्व्ह बँकेने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर नोव्हेंबर 2016 मध्ये दोन हजार रुपयांची चलनी नोट बाजारात आणली होती. पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्दबातल ठरविल्यानंतर चलन व्यवहारामध्ये कमतरता पडू नये, यासाठी दोन हजार रुपयांची नोट आणली असली, तरी प्रारंभापासूनच ही चलनी नोट बंद होण्याची चर्चा रंगत होती. रिझर्व्ह बँकेने या नोटा बंद करण्याची प्रक्रिया अत्यंत टप्प्याटप्प्याने राबविली.

पुनर्चलनी व्यवहार बंद

2018-19 या आर्थिक वर्षात दोन हजार रुपयांच्या नोटांची छपाई थांबविली होती. यावेळी चलनातील नोटांचे मूल्य 6 लाख 73 हजार कोटी रुपये इतके होते. या नोटा बँकेत जमा होतील, तसतसे त्यांचे पुनर्चलनी व्यवहार बंद केले. यानंतर 31 मार्च 2023 रोजी आर्थिक वर्षाअखेरीस एकूण चलनी नोटांच्या संख्येच्या प्रमाणात दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण 10.8 टक्के आणि मूल्य 3 लाख 62 हजार कोटी रुपये इतके होते. आता 31 ऑक्टोबरअखेर ते मूल्य घसरून 10 हजार कोटींवर आले आहे.

Back to top button