कोल्हापूर जिल्ह्यात 13 ग्रामपंचायतींत सत्तांतर | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यात 13 ग्रामपंचायतींत सत्तांतर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात अतिशय चुरशीने लढल्या गेलेल्या आणि भाऊबंदकीची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांत स्थानिक आघाड्यांना संमिश्र यश मिळाले. निम्म्यापेक्षा अधिक गावांमध्ये स्थानिक आघाड्यांनी बाजी मारली आहे. 13 ग्रामपंचायतींमध्ये प्रस्थापितांना धक्का देत गावकर्‍यांनी सत्तांतर घडवून आणले आहे.

सत्तांतर झालेल्या ग्रामपंचायतींमध्ये जठारवाडी, सांगवडेवाडी, चिंचवाड (करवीर), मुरुकटेवाडी (चंदगड), पेरणोली, बुरुडे, मेंढोली (आजरा), कसबा वाळवे, पालकरवाडी, बारडवाडी व चांदेकरवाडी (राधानगरी), शिंदेवाडी (भुदरगड) व अर्जुनवाडा (गडहिंग्लज) यांचा समावेश आहे.

जिल्ह्यातील जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींपैकी 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. त्यामुळे 74 ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान घेण्यात आले होते. या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. रात्रीपासूनच मिळणार्‍या मतांचे आडाखे कार्यकर्त्यांकडून बांधण्यात येत होते. या निवडणुकीत बहुतांशी ठिकाणी स्थानिक आघाड्यांमध्ये लढत झाली. काही ठिकाणी एकाच नेत्यांच्या दोन गटामध्ये लढती झाल्याचे पाहावयास मिळाले. त्यामुळे जवळपास 36 ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक आघाड्यांना यश मिळाले आहे. निकालानंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष केला.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत फारसे काही हाती लागले नाही. एकेकाळी दोन खासदार, पाच आमदार त्यापैकी तीन मंत्री, अशी सत्ता असलेल्या राष्ट्रवादीला जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीत पिछाडीवर जावे लागले. दरम्यान, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत आम्हालाच चांगले यश मिळाले असल्याचा दावा नेते करत आहेत.

Back to top button