कोल्हापूर : 100 टीएमसी साठा, तरीही काटकसरीची वेळ | पुढारी

कोल्हापूर : 100 टीएमसी साठा, तरीही काटकसरीची वेळ

सुनील सकटे

कोल्हापूर : पावसाच्या बाबतीत निसर्गाचे वरदान असणार्‍या आणि धरणांत बारमाही पाणीसाठा उपलब्ध असणार्‍या जलसंपन्न कोल्हापूर जिल्ह्यात आता पाणीपुरवठ्याच्या योग्य नियोजनाची गरज आहे. लहान-मोठी धरणे, तलावांत सुमारे 100 टीएमसी पाणीसाठा असूनही यंदा झालेल्या कमी पावसामुळे शेतीसह पिण्याचे पाणी काटकसरीने वापरण्याची वेळ आली आहे.

पावसाच्या द़ृष्टीने जिल्ह्यास वरदान आहे. याबरोबरच राधानगरी धरणामुळे जिल्हा सुजलाम्-सुफलाम् बनला आहे. राधानगरी, काळम्मावाडी, वारणा, तुळशी या चार मोठ्या धरणांमुळे जिल्ह्यात बारमाही पिकांचे उत्पादन घेतले जाते. जिल्ह्यात वर्षभर सरासरी 1,000 ते 1,500 मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा मात्र सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. यंदा केवळ 710 मि.मी. पाऊस झाला आहे. असे असूनही जिल्ह्यातील विविध धरणांत पाणीसाठा समाधानकारक आहे. जिल्ह्यात चार मोठे, दहा मध्यम प्रकल्प आहेत; तर लघू पाटबंधारे तलाव 56 आहेत. या सर्व प्रकल्पांची जबाबदारी जलसंपदा विभागाची आहे. याव्यतिरीक्त जलसंधारण विभागाकडे जिल्ह्यातील दुर्गम भागात 27 लघू पाटबंधारे तलाव आणि 79 पाझर तलावांची जबाबदारी आहे. या सर्व प्रकल्पांत एकूण सुमारे 96 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे. गतवर्षी 92.41 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा दोन टीएमसी पाणी जादा असले, तरी दूधगंगा धरण दुरुस्तीवेळी धरणातील पाणीसाठा कमी होणार आहे.

ऑक्टोबरअखेर जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील जिल्ह्यातील मोठ्या चार प्रकल्पांत 68.68 टीएमसी, दहा मध्यम प्रकल्पांत 19.83 टीएमसी, तर 56 लघू पाटबंधारे प्रकल्पांत 6.25 टीएमसी पाणीसाठा आहे. जलसंधारण विभागाकडील 27 लघू पाटबंधारे तलावांमध्ये 1.56 टीएमसी, तर 79 पाझर तलावांमध्ये 0.56 टीएमसी पाणी शिल्लक आहे. जिल्ह्यात पाणी मुबलक असले, तरी सध्या दुष्काळसद़ृश स्थिती निर्माण झाल्याने पाणी काटकसरीने वापरावे लागणार आहे. अशातच दूधगंगा धरणाची गळती काढण्यास मान्यता मिळाल्याने दुरुस्तीसाठी धरणातील पाणीसाठा कमी केला जाणार आहे. शेतीसाठी ऑक्टोबर मध्यापासूनच धरणातील पाणी सोडण्यात येत असल्याने जलसंपदा विभागास उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्याची तारेवरील कसरत करावी लागणार आहे.

‘कमी पाणी लागणारी पिके घ्या’

रब्बी व उन्हाळी हंगामासाठी शेतकर्‍यांनी पाण्याची गरज कमी असलेल्या पिकांची निवड करावी. नदीच्या लाभक्षेत्रात नेहमीप्रमाणे उसाची लावण करून दूधगंगा धरणाच्या कालव्याच्या लाभक्षेत्रामध्ये मर्यादित क्षेत्रावर उसाची लागवड करण्यात यावी, मागील वर्षीपेक्षा जास्त उसाची लावण करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभाग कोल्हापूर उत्तरच्या कार्यकारी अभियंता स्मिता माने यांनी केले आहे.

Back to top button