कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस 5 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार | पुढारी

कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस 5 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोनापासून बंद असलेली कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस 5 नोव्हेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. मात्र, 31 डिसेंबरपर्यंत ही गाडी कोल्हापूर ते पुणे अशी विशेष रेल्वे म्हणून धावणार आहे. यानंतर ही गाडी पूर्ववत मुंबईपर्यंत धावण्याची शक्यता आहे.

कोरोना कालावधीत बंद केलेल्या गाड्या टप्प्याटप्याने पुन्हा सुरू करण्यात आल्या. मात्र, त्यापैकी सह्याद्री एक्स्प्रेससह चार गाड्या अद्याप सुरू केल्या नाहीत. सह्याद्री एक्स्प्रेस तरी तत्काळ सुरू करा, सातत्याने मागणी केली जात आहे. याबाबत लोकप्रतिनिधींकडूनही पाठपुरावा सुरू आहे. कोल्हापूर ते मुंबई मार्गावर ही गाडी सुरू करण्यास सध्या अडचण असली तरी ही गाडी किमान कोल्हापूर ते पुणे या मार्गावर तरी सोडावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यावर मध्य रेल्वेने रेल्वे बोर्डाला तसा प्रस्ताव सादर केला होता.
दि. 5 नोव्हेंबर ते दि. 31 डिसेंबर या कालावधीसाठी कोल्हापूर-पुणे या मार्गावर विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. सह्याद्री एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसारच कोल्हापूर-पुणे मार्गावर ही गाडी धावणार आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

लवकरच मुंबईपर्यंत धावणार

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर प्लॅटफॉर्म बांधणीचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर, सह्याद्री एक्स्प्रेस पूर्ववत मुंबईपर्यंत धावेल, असे खा. धनंजय महाडिक व खा. धैर्यशील माने यांनी सांगितले. या गाडीसाठी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचेही त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले.

Back to top button