कोल्हापूर महापालिका प्रभाग रचना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू | पुढारी

कोल्हापूर महापालिका प्रभाग रचना करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा -

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी कच्ची प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. महापालिकेच्या आठ अधिकार्‍यांची टीम त्यासाठी रात्रं-दिवस कार्यरत आहे. राज्य निवडणूक आयोगाने 19 नोव्हेंबरपर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार करून पाठविण्याचे आदेश दिले आहेत.

कोल्हापूर महापालिका प्रभाग रचना : महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच त्रिसदस्य प्रभाग रचना पद्धतीने निवडणूक होणार आहे. यापूर्वीच्या सर्वच प्रभागांच्या हद्दी बदलणार आहेत. भौगोलिक संलग्नता व ब्लॉकनुसार सर्वच प्रभागांची फेररचना केली जात आहे. प्रत्येकी 3 नगरसेवकांचे 30 प्रभाग व 2 नगरसेवकांचा 1 असे शहरात एकुण 31 प्रभाग असतील. महापालिकेचे नवे सभागृह 92 नगरसेवकांचे असेल. सुमारे 17 हजार 910 लोकसंख्येचा एक प्रभाग असेल. महापालिका सभागृहाची मुदत 15 नोव्हेंबर 2020 ला संपली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक झालेली नाही. मार्च-एप्रिल 2022 मध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे.

विकासकामे, गॅरंटीचे लागणार बोर्ड –

कोल्हापूर शहरात आता रस्त्यासह विविध विकासकामे सुरू झाल्यावर त्यासंदर्भातील माहितीचे बोर्ड लागणार आहेत. विकासकामांच्या ठिकाणीच हे फलक असतील. त्यात कोणत्या फंडातून काम, निधी किती, ठेकेदाराचे नाव, कामाची मुदत आदींसह इतर माहितीचा समावेश आहे. परिख पूल नूतनीकर समितीचे फिरोज शेख यांनी त्यासाठी पुढाकार घेऊन प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानुसार पहिला बोर्ड परिख पूल ते जनता बझार या रस्त्यासाठीच्या कामाचा लावण्यात आला.

कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अक्षरशः वाट लागली आहे. रस्ते खड्डेमय झाले आहेत. यात काही महिन्यांपूर्वी आणि गेल्यावर्षी केलेल्या रस्त्यांचाही समावेश आहे. गॅरंटीचे रस्त्येही खराब झाले आहेत. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, नागरिकांतून तीव— संताप व्यक्त होत होता. रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची मागणी शहरवासीयांतून केली जात आहे.

Back to top button