स्वच्छ सर्वेक्षण २०२१ : धुळेतील शिरपूर शहराला ३ स्टार मानांकन | पुढारी

स्वच्छ सर्वेक्षण २०२१ : धुळेतील शिरपूर शहराला ३ स्टार मानांकन

धुळे; पुढारी वृत्तसेवा : स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अभियानात शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या उत्तम कामगिरीमुळे व प्रभावी अंमलबजावणीमुळे केंद्र शासनाने शिरपूर शहराला 3 स्टार मानांकन (3 Star Rating) जाहीर केले. यामुळे शिरपूरकरांची मान उंचावली असून, इथल्या सर्व नागरिकांसाठी ही बाब अभिमानाची व भूषणावह आहे, अशी माहिती नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांनी दिली.

स्वच्छ भारत मोहिमेतंर्गत (Clean Survey 2021 Campaign) देशातील शहरे कचरामुक्त करण्याकडे वाटचाल करण्यासाठी केंद्र सरकारने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ‘स्टार रेटिंग’ची संकल्पना जाहीर केली होती. त्यानुसार झालेल्या सर्व्हेत शिरपूर शहराची केंद्र सरकारच्या त्रयस्थ समितीकडून तपासणी करण्यात आली. त्याअन्वये केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी विकास मंत्रालयाने शिरपूर वरवाडे नगरपरिषदेच्यावतीनं शिरपूर शहराला 3 स्टार मानांकन घोषित केले. याबाबतचा पुरस्कार वितरण सोहळा दि. 20 नोव्हेंबर २०२१ रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली या ठिकाणी होणार आहे.

स्वच्छ सर्वेक्षण २०२१- शिरपूर 3 स्टार मानांकन : निकष काय आहेत ?

घरोघरी जाऊन कचरा संकलन करणे, निर्मितीच्या जागीच कचऱ्याचे विलगीकरण करणे, सार्वजनिक, व्यावसायिक आणि निवासी भागांतील दैनंदिन स्वच्छता करणे, मैलापाणी वाहिन्या, नाले स्वच्छता करणे, शहरात उपलब्ध कचरापेट्यांची संख्या आणि त्यांची स्वच्छता, मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या आस्थापनांकडून नियमांचे पालन करुन घेणे, अस्वच्छतेबाबत दंड आकारणे, शुल्क आकारणी आणि प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी, नागरिकांच्या समस्यांचे निराकरण आणि अभिप्राय प्रणाली, शहरातील गटारांची आणि नैसर्गिक जलसाठ्यांची स्वच्छता, कालानुरूप कचरा निर्मितीच्या प्रमाणात घट व शहर सौंदर्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जातात.

शिरपूरला का मिळाले मानांकन?

माजी शालेय, शिक्षण व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी 1985 पासून शिरपूर शहर स्वछ बनविण्याचा नेहमीच यशस्वी प्रयत्न केला असून शहरवासीयांनी देखील वेळोवेळी त्यांना साथ दिली आहे. स्वच्छ, सुंदर व हरित शिरपूर हे अनेक चांगल्या सोयी सुविधांमुळे अनेकांनी आपल्या पसंतीचे शहर म्हणून नेहमीच प्राधान्य दिले असल्याचे दिसून आले आहे.

गेल्या वर्षी स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये 50 हजार ते 1 लाख पेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरांपैकी शिरपूर शहराने संपूर्ण भारताच्या पश्चिम झोन मध्ये 6 वा, महाराष्ट्रात 6 वा क्रमांक तसेच संपूर्ण भारत देशात 42 वे उत्कृष्ट शहर जाहीर झाला होता. यापूर्वी देखील शिरपूर नगर परिषदेला शासनाचे अनेक बक्षिसे मिळाल्याने देशात व राज्यात नामांकित शहरांपैकी शिरपूरने आपले आदर्शवत स्थान कायम राखले आहे. यापूर्वी शिरपूर नगर परिषदेने संत गाडगेबाबा अभियानात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावले आहेत. पाणी पुरवठा योजनेबाबत देखील विशेष पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महाराष्ट्र राज्याने पर्यावरणाबाबत वसुंधरा पुरस्कार देवून देखील गौरविले आहे. देशातील पहिले स्वच्छता मंदिर हे शिरपूर वरवाडे नगर परिषदेत उभारण्यात आल्याची बाब देखील गौरवपूर्ण ठरली आहे.

“स्वच्छ शिरपूर, सुंदर शिरपूर, हरित शिरपूर” कायमस्वरूपी राहण्यासाठी स्वच्छतेचा वसा कायमस्वरूपी जपण्यासाठी वेळोवेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी, कर्मचारी सर्वांनी प्रयत्न केले. तसेच सातत्याने व नियमितपणे नगरपरिषदेचे कामकाज आदर्शवत सुरु ठेवले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेची यशस्वी घोडदौड सुरु आहे. शिरपूर शहराला 3 स्टार मानांकन जाहीर झाल्याने लोकनियुक्त नगराध्यक्षा जयश्रीबेन पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, सर्व नगरसेवक, सर्व नगरसेविका, मुख्याधिकारी तुषार नेरकर, प्रशासकीय अधिकारी संजय हासवाणी, नगर अभियंता माधवराव पाटील, नोडल ऑफिसर सागर कुलकर्णी, स्वच्छता निरीक्षक जितेंद्र अहिरे, आरोग्य सहाय्यक दिपाली साळुंके, सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आनंद व्यक्त केला.

हे ही वाचा :

 

 

Back to top button