

माझ्या नवऱ्याची बायको फेम ईशा केसकर हिला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. ज्युनिअर शनाया म्हणून ईशा केसकर हिने ओळख मिळवलीय. ईशा खूप सुंदर आहे. तिने दमदार अभिनयाने प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवले आहे.
ईशाचा जन्म ११ नोव्हेंबर, १९९१ मध्ये पुण्यात झाला. ईशा ही मूळची वैराग (बार्शी) येथील आहे. तिने आपले शालेय शिक्षण पुण्यातील सिंहगड शाळेतून तर महाविद्यालयीन शिक्षण सिम्बायोसिस महाविद्यालयातून पूर्ण केले. महाविद्यालयात असताना ईशा हिने पुरुषोत्तम करंडक तसेच सवाई नाटक अशा स्पर्धात भाग घेतला. अनेक एकांकिकांमधून कामे केली.
टीव्हीवरील 'जय मल्हार' मालिकेमधल्या बानूच्या भूमिकेमुळे ती घराघरांत पोहोचली. मंगलाष्टक वन्स मोअर, याला जीवन ऐसे नाव, वुई आर ऑन होऊन जाऊ द्या, सी आर डी (हिंदी चित्रपट) तर जय मल्हार, माझ्या नवऱ्याची बायको यासारख्या मालिकांमध्ये तिने काम केलंय.
माझ्या नव-याची बायको या मालिकेतील शनाया या तिच्या भूमिकेचे खूप कौतुक झाले. पण खासगी कारणामुळे ईशाने ही भूमिका अर्ध्यावर सोडली होती. मी गालिब, रायगडाला जेव्हा जाग येते (येसूबाई) यासारख्या नाटकांमध्ये तिने काम केलंय.
सिम्बॉयसिस कॉलेजमधून शिक्षण घेताना ईशाला जपानी भाषा शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली होती. एके दिवशी 'कोठारे प्रॉडक्शन'ची ऑडिशन असल्याचे तिला समजले. त्याचवेळी ईशाला जपानला जायची संधी आली होती. दोन्ही गोष्टींपैकी काय निवडावे अशा द्विधा मनस्थितीत ईशा होती. तिने अभिनयाचा मार्ग निवडला आणि तिने मालिकेत काम करण्याचा निर्णय घेतला.
जय मल्हार मालिकेच्या ऑडिशनला जाताना बाबांनी एक प्रयत्न कर. आपणास हवे ते क्षेत्र आपली वाट पहात असतेच. संधी घ्यायला हरकत नाही, बाबांनी ईशाला सांगितले होते.
काहे दिया परदेस या मालिकेतून लोकप्रिय झालेला अभिनेता ऋषी सक्सेनासोबत ईशा रिलेशनशिपमध्ये आहे. ईशा आणि ऋषीची पहिली भेट चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाच्या सेटवर झाली होती. त्यांच्या रिलेशनशीपला ४ वर्ष पूर्ण झाले आहेत.