Rape case : मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास आजन्म कारावास | पुढारी

Rape case : मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापास आजन्म कारावास

चंद्रपूर, पुढारी वृत्तसेवा : मतिमंद मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार (Rape case) करणाऱ्या नराधम पित्यास वरोरा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. के. भेंडे यांनी ही शिक्षा सुनावली आहे.

वरोरा  तालुक्यातील निलजई येथील आरोपी सुभाष भडके या नराधम पित्याने स्वत:च्या  मतिमंद मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार  केल्याने तिला गर्भधारणा झाली होती. तसेच मुलीच्या आईने पतीला मुलीसोबत दुष्कर्म करतांना पाहिले. त्यावेळी तिने पतीला याबाबत जाब विचारला असता आरोपी पतीने पत्नी आणि पीडित मुलीला मारहाण केली.

आरोपी हा घरी कोणी नसताना पीडित मतिमंद मुलीसोबत दुष्कर्म (Rape case) करीत असे. तसेच नेहमी मारहाण करून आरोपी हा पत्नी, मुलगी आणि मुलास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होता. त्याच्या या जाचक त्रासाला कंटाळून पीडित मुलीची आई, पीडित मुलगी आणि मुलाला सोबत घेऊन माहेरी निघून गेली.

पतीच्या दुष्कृत्याबाबत नातेवाइकांना माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईने आरोपीविरुद्ध वरोरा पोलीस स्टेशनमध्ये 14 मे 2018 रोजी तक्रार दाखल केली. या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायालयाने सहा साक्षीदारांची साक्ष नोंदवून घेतली.

सबळ पुराव्यावरून आरोपीस कलम 376/ 2 चे (एल)(एन) आजन्म कारावासाची शिक्षा आणि दोन हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास ३ महिने कारावास सुनावला आहे. तसेच कलम 506 भादवी अन्वये 3 महिने कारावास आणि रुपये 1 हजार दंड आणि दंड न भरल्यास एक महिना कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारतर्फे सहा. सरकारी वकील मिलिंद देशपांडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली.

Back to top button