देशात आता लग्नसराईची उडणार धूम! | पुढारी

देशात आता लग्नसराईची उडणार धूम!

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाल्यानंतर आता भारतीयांना दीपावलीचे वेध लागले आहेत. विशेषतः तुलसी विवाहानंतर सुरू होणार्‍या लग्नाचे बार यंदा धूमधडाक्यात उडण्याचे संकेत असून देशातील व्यापार्‍यांच्या महासंघाने लग्नसराईच्या अवघ्या 23 दिवसांत देशात 4 लाख 25 हजार कोटी रुपयांची उलाढाल होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे.

कन्फिड्रेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (सीएआयटी) ही व्यापार्‍यांची शिखर संघटना देशांतर्गत व्यापाराच्या उलाढालीवर लक्ष ठेवून असते. त्यांच्या माहितीनुसार गतवर्षी देशभरात लग्नसराईच्या काळामध्ये सुमारे 32 लाख विवाह समारंभांचे आयोजन झाले होते. लग्नसाहित्य खरेदीच्या उलाढालीने 3 लाख 75 हजार कोटी रुपयांचा आकडा गाठला होता. कोरोनाचे शेपूट वळवळत असताना व्यापाराची ही उंची विस्मयकारक वाटत होती. परंतु, आता याच संस्थेने नव्याने केलेल्या सर्वेक्षणानुसार यंदा सुमारे 35 लाख विवाह समारंभ या काळात उरकले जाणार आहेत.

व्यापार्‍यांच्या शिखर संघटनेने केलेल्या सर्वेक्षणामध्ये 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर हा कालावधी लक्षात घेतला आहे. तथापि, 15 डिसेंबरपासून मे महिन्यापर्यंत भारतामध्ये लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू असतो. या एकत्रित कालावधीचा विचार केला, तर केवळ लग्नसराईची देशातील उलाढाल 6 लाख कोटी रुपयांचा उंबरठा लिलया ओलांडेल, अशी स्थिती आहे.

50 हजार आलिशान विवाह

सर्वेक्षणातील एकूण 35 लाख विवाहसमारंभांपैकी 50 हजार विवाह हे आलिशान पद्धतीने होतील. त्यावर प्रत्येकी एक कोटीहून अधिक खर्च अपेक्षित आहे, तर 50 लाख रुपये खर्चाच्या विवाह समारंभांची संख्याही तितकीच आहे. शिवाय, 6 लाखांहून अधिक विवाह समारंभांवर 25 लाख रुपयांपर्यंत खर्च केला जाऊ शकतो. 12 लाख विवाह 10 लाखांच्या मर्यादेत, तर अन्य 10 लाख विवाहांसाठी प्रत्येकी 6 लाख रुपये मोजले जातील, असा सर्वेक्षणाचा निष्कर्ष आहे. विवाह समारंभांसाठी भव्य कार्यालये, पंचतारांकित हॉटेल्स यांचे आगाऊ आरक्षण जोमात आहे. कपडे खरेदीवर हजारो कोटींची उलाढाल शक्य आहे, तर जेवणावळीच्या किती पंगती उठतील, याचा अंदाज बांधणेही कठीण आहे.

Back to top button