Ranjit Singh Ghatge: वकील रणजीतसिंह घाटगे यांची सनद रद्द | पुढारी

Ranjit Singh Ghatge: वकील रणजीतसिंह घाटगे यांची सनद रद्द

पुढारी ऑनलाईन डेस्क : कोल्हापूर येथील वकील रणजितसिंह घाटगे यांची वकिलीची सनद पाच वर्षासाठी काढून घेण्याचा निर्णय भारतीय वकील परिषदेच्या शिस्तपालन समितीने घेतला आहे. त्यामुळे रणजीतसिंह घाटगे वकील म्हणून पुढील पाच वर्षासाठी कोणत्याही न्यायालयात काम करू शकणार नाहीत. (Ranjit Singh Ghatge)

इचलकरंजी येथील एका महिला पक्षकाराने वकील रणजीत सिंह घाटगे (Ranjit Singh Ghatge) यांच्याविरुद्ध बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे शिस्तपालन समितीकडे घाटगे यांनी कायदेशीर नीतिमत्ता पाळली नाही, या कारणासाठी वकील कायदा कलम 35 नुसार तक्रार दाखल केली होती. तक्रारदार महिलेचा पती मृत झाल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी त्या महिलेचा कुटुंबातील व मालमत्तेवरील हक्क नाकारला होता. महिलेने तिचा हक्क मिळवण्यासाठी रणजीत घाटगे याच्याशी संपर्क साधला. रणजीत घाटगे यांनी वाटणीचा दावा करतो व तुम्हाला सर्व प्रॉपर्टी मिळवून देतो, यासाठी रक्कम रुपये दोन कोटी फी पोटी द्यावे लागतील असे सांगितले, संबंधित महिलेने रणजीत घाटगे याला रक्कम रुपये ११ लाख फी पोटी दिले, परंतु, बाकी रक्कम देणे शक्य नसल्याने उर्वरित रकमेसाठी मुदत मागितली असता रणजीत घाटगे यांने उर्वरित रकमेसाठी पक्षकार महीलेला मिळणाऱ्या प्रॉपर्टी मधील 33 % हिस्सा स्वतःच्या नावे लिहून घेतला, तसा लेखी करार केला व प्रॉपर्टी मिळवून देण्याची हमी दिली. तथापि, दिलेले हमीप्रमाणे कोणतेही काम कोर्टात दाखल केले नाही व फी पोटी घेतलेली रक्कम ही परत दिली नाही. त्यामुळे, प्रॉपर्टीत हिस्सा लिहून घेण्याचे कृती बेकायदेशीर व व्यावसायिक शिस्त अनुपालन भंग करणारी आहे, अशा स्वरूपाची तक्रार पक्षकार महिलेने दाखल केली होती.

तक्रार सुरुवातीस बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा च्या शिस्तपालन समितीकडे आली असता शिस्तपालन समितीचे सदस्य अॅड.  आशिष पंजाबराव देशमुख यांनी रणजीत घाटगे याला सकृत दर्शनी दोषी मानून सदरची तक्रार 3 सदस्य शिस्तपालन समितीकडे देण्याचा हुकूम केला. त्यांच्या हुकुमानुसार व सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार सदरची तक्रार भारतीय विधीज्ञ परिषदेच्या शिस्तपालन समिती समोर पाठवण्यात आली. समितीने सदरची चौकशी नुकतीच पूर्ण केली आहे. चौकशी वेळी तक्रारदार महिलेकडून इचलकरंजी येथील अॅड. अमित सिंग यांनी काम चालवले. तसेच रणजीत घाटगे याने स्वतः काम चालवले, या कामी वकिलाला पक्षकाराकडून फी व्यतिरिक्त इतर कोणत्याही मार्गाने कोणतीही मालमत्ता मागता येणार नाही, वकिलाने फी घेतल्यानंतर काम दाखल करणे व प्रामाणिकपणे चालवणे वकिलाची जबाबदारी आहे, रणजीत घाटगे याचे वर्तन हे गैरवर्तन असलेचे स्पष्ट करत शिस्तपालन समितीने रणजीत घाटगे याला अंतिम दोषी धरले.

रणजीत घाटगे याने रक्कम रुपये अकरा लाख मिळाले नाहीत, असा बचाव केला होता. तथापि, तक्रारदार महिलेने बँकेचा खाते उतारा हजर करून तो बचाव चुकीचा ठरवला, तसेच रणजीत घाटगे याने बेकायदेशीरपणे लिहून घेतलेला 33 टक्के  हिस्सा मागणीचा करारच शिस्तपालन समितीसमोर हजर केला, तक्रारदार महिलेस दोन लहान मुले असून त्यांचाही हिस्सा लिहून घेण्यात आला आहे, असे त्या महिलेचे म्हणणे होते, तसेच घाटगे याने वकील कायदा कलम 35 नुसार व्यावसायिक गैरवर्तन केले असे म्हणणे होते, ते मान्य करण्यात येऊन घाटगे याला दोषी धरण्यात आले. व त्याची सनद पाच वर्षासाठी रद्द करण्यात आली आहे. तसेच तक्रारदार महिलेस 6 टक्के  व्याजाने रक्कम रुपये 14 लाख परत देण्याचाही आदेश करण्यात आला आहे. सदरची रक्कम रुपये 14 लाख व्याजासह परत न केल्यास   घाटगे याची सनद कायमपणे रद्द करण्यात येईल, असेही निर्देश दिले आहेत.

हेही वाचा 

Back to top button