Kolhapur Panchganga Flood : कोल्हापूरला महापुराचा धोका आणखी वाढण्याची चिन्हे! | पुढारी

Kolhapur Panchganga Flood : कोल्हापूरला महापुराचा धोका आणखी वाढण्याची चिन्हे!

सुनील कदम

कोल्हापूर : नव्याने होत असलेल्या रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या कामामुळे कोल्हापूर शहराला नेहमीच जाणवणारा महापुराचा धोका आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्यामुळे संभाव्य महापुराचा धोका विचारात घेऊन आधीपासूनच त्याबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

नवीन रत्नागिरी-नागपूर महामार्ग शिये भुये भुयेवाडी- केली केले – वाघबीळ-बोरपाडळे या मार्गे जातो. यापैकी शिवे ते भुयेवाडी हे साधारणतः ७ किलोमीटरचे अंतर अंतर पूरपट्ट्यातून जात असल्याचे महामार्गासाठी तयार करण्यात आलेल्या उपलब्ध नकाशातून स्पष्ट होते. २००५, २०१९ आणि २०२१ सालच्या महापुरात या ठिकाणी जवळपास २० ते २५ फूट पाणी होते. या भागातूनच नवीन महामार्ग जातो. महापुराचा हा संभाव्य धोका टाळून, या भागातून महामार्ग न्यायचा झाला, तर या भागात महामार्गाची उंची २५ ते ३० फुटांपर्यंत वाढवावी लागणार आहे. साहजिकच त्या ठिकाणी तेवढी भर घालावी लागणार आहे

पंचगंगा नदीला महापूर आल्यानंतर महापुराचे पाणी वडणगे, आंबेवाडी, शिये, भुये, भुयेवाडी, निगवे, पोहाळे, जठारवाडी आदी नदीकाठच्या गावांमध्ये आणि त्या गावांच्या शेतशिवारांमध्ये पसरते. पण, नवीन रत्नागिरी- नागपूर महामार्गाच्या भरावामुळे शेतशिवारांत पसरले जाणारे हे पाणी अडविले जाणार आहे. साहजिकच अडविले जाणारे हे पाणी कोल्हापूर शहराच्या दिशेने सरकून शहराला मुळातच असलेला महापुराचा धोका आणखी काही पटीने वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

पुणे-बेंगलोर महामार्गाच्या कामात करण्यात आलेल्या भरावामुळे पंचगंगेच्या प्रवाहाला मोठा अडथळा निर्माण झाल्याची बाब अनेक तज्ज्ञांच्या अभ्यासाअंती सिद्ध झालेली आहे. असे असताना पुन्हा पंचगंगेच्या पूरबाधित प्रदेशातून नवीन महामार्ग बांधणे म्हणजे आणखी मोठ्या प्रमाणात महापुराला निमंत्रण देण्यासारखे होणार आहे. त्यामुळे नवीन महामार्गाचे बांधकाम करताना भरावाऐवजी उड्डाण पुलांसारखे पर्याय शोधण्याची आवश्यकता आहे; अन्यथा कोल्हापूर शहराच्या नशिबी आधीच असलेल्या महापुरात आणखी भर पडण्याचा धोका आहे.

त्याचप्रमाणे पंचगंगेला महापूर आल्यानंतर कोल्हापूर-रत्नागिरी हा जुना महामार्ग पाण्याखाली जातो आणि कोल्हापुरातून कोकणात चालणारी वाहतूक पूर्णपणे बंद पडते. नवीन महामार्गामुळे ही वाहतूक कोंडी फुटून वाहतुकीचा नवीन मार्ग उपलब्ध होईल, अशी आशा होती. पण, नवीन महामार्गही परपट्ट्यातूनच जाणार असल्यामुळे महापुराच्या वेळी काही काळ हा महामार्गही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन महामार्ग बांधला जात असताना महापुरासह अन्य सर्व शक्यता गृहीत धरून त्याचे बांधकाम होण्याची आवश्यकता आहे.

Back to top button