कोल्हापूर : उदगाव सरपंचांवरील अविश्वास ठराव कायम, मुंबई उच्च न्यायालयाने नदाफ यांची याचिका फेटाळली | पुढारी

कोल्हापूर : उदगाव सरपंचांवरील अविश्वास ठराव कायम, मुंबई उच्च न्यायालयाने नदाफ यांची याचिका फेटाळली

जयसिंगपूर; पुढारी वृत्तसेवा : उदगाव (ता. शिरोळ) येथील सरपंच कलीमुन नदाफ यांच्यावर मनमानी कारभार व भ्रष्टाचाराचे आरोप करत दि. 17 मार्च 2023 रोजी 14 सदस्यांनी अविश्वास आणला होता. यानंतर सरपंचांनी जिल्हाधिकारी कोर्टात धाव घेतली होती. दि. 22 ऑगस्ट 2023 रोजी सरपंचांवर अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला होता. यानंतर सरपंच नदाफ यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर गुरुवारी (दि.12) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यामध्ये न्यायाधीशांनी सरपंच कलीमुन नदाफ यांची याचिका फेटाळून लावत जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी दिलेला निर्णय कायम केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, उदगाव ग्रामपंचायतीची सन 2020 ते 26 या कालावधीकरिता निवडणूक झाली होती. यात स्वाभिमानीचे नऊ सदस्य व ग्राम विकास आघाडीचे आठ सदस्य असे निवडून आले होते. त्यानंतर स्वाभिमानीच्या गटातून श्रीमती कलीमुन नदाफ यांनी बाहेर पडून ग्रामविकास आघाडीमध्ये प्रवेश करत सरपंच पद घेतले होते.

उपसरपंच म्हणून हिदायत अहमद नदाफ यांची निवड झाली होती. तर सरपंच कलिमुन नदाफ यांच्या बेकायदेशीर व भ्रष्ट कारभार दिसू लागल्याने ॲड. हिदायत नदाफ यांनी आपल्या उपसरपंच पदाचा एक महिन्याच्या कालावधीमध्येच राजीनामा दिला होता. त्यानंतर सरपंच कलीमुन नदाफ यांच्यावर भ्रष्ट कामाचा आरोप करीत 17 पैकी 14 सदस्यांनी त्यांच्यावर 17 मार्च 2023 रोजी अविश्वास आणला होता.

सरपंच कलीमुन नदाफ यांच्यावर 24 मार्च 2023 रोजी अविश्वास मंजूर झाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे विवाद अर्ज दाखल केला होता. तो विवाद अर्ज जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी 22 ऑगस्ट 2023 रोजी मंजूर केला होता. त्याविरुद्ध सरपंच नदाफ यांनी हायकोर्ट मुंबई येथे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला विरोध करणारी याचिका दाखल केली होती. त्यास हिदायत नदाफ व इतर सदस्यातर्फे उच्च न्यायालयातील वकील उदय प्रकाश वारुंजीकर यांनी बाजू मांडली.

याची आज (दि. 10) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायमूर्ती माधव जामदार यांनी सरपंच कलीमुन नदाफ यांची याचिका फेटाळून लावत जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी दिलेला निर्णय कायम केला आहे.

हेही वाचा :

Back to top button