कोल्हापुरात अजित पवारांची शिंदे गटावरच मदार | पुढारी

कोल्हापुरात अजित पवारांची शिंदे गटावरच मदार

चंद्रशेखर माताडे,

कोल्हापूर :  बदलत्या राजकीय परिस्थितीत अजित पवार गटाची ताकद जिल्ह्यात असूनही, लोकसभेसाठी त्यांची मदार शिंदे गटावरच आहे. अजित पवार गटाचे दोन्ही आमदार महायुतीत सहभागी झाले आहेत. तरीही लोकसभेसाठी आखाड्यात न उतरता शिंदे गटाच्या उमेदवारावर त्यांची मदार आहे. आता महाविकास आघाडीचा उमेदवार कोण यावर चुरस अवलंबून आहे. त्यातच राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक यांनी भाजपने आदेश दिल्यास आखाड्यात उतरू, असे सांगून लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढण्याची तयारी दाखवली आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादीची स्थापनेपासून ताकद होती. 1999 साली राष्ट्रवादीची स्थापना झाली तेव्हा जिल्ह्याचे दोन्ही खासदार व 12 पैकी पाच आमदार राष्ट्रवादीचे होते. त्यापैकी तीन आमदार मंत्री झाले; मात्र राष्ट्रवादीची ताकद घटत गेली आणि आता केवळ दोन आमदार त्यांच्याकडे राहिले. हे दोन्ही आमदार आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत सहभागी झाले आहेत. पक्षाचे जिल्हा अध्यक्षही अजित पवार गटात गेल्याने व्ही. बी. पाटील यांच्याकडे अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली आहे.

जिल्ह्यात राष्ट्रवादीकडून उमेदवाराचा शोध सुरू आहे. मध्यंतरी पी. एन. पाटील व सतेज पाटील यांची नावे चर्चेत आली; मात्र ते दोघेही विधानसभेसाठी इच्छुक असल्याने महाविकास आघाडीला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे तत्कालीन खासदार धनंजय महाडिक यांचा पराभव करून शिवसेनेचे संजय मंडलिक निवडून आले. मंडलिक यांना 7 लाख 49 हजार 85 तर महाडिक यांना 4 लाख 78 हजार 517 मते मिळाली. महाडिक यांच्याशी असलेल्या राजकीय वादातून काँग्रेसचे सतेज पाटील यांनी ‘आमचं ठरलयं’ ही टॅगलाईन वापरुन आपली ताकद संजय मंडलिक यांच्यामागे उभी केली. तर राष्ट्रवादीतील नाराज गटही मंडलिक यांच्या मागे उभा राहिला आणि महाडिक यांचा तब्बल 2 लाख 70 हजार 568 मताने पराभव झाला. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या लोकसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या सहापैकी पाच मतदार संघांवर काँग्रेस राष्ट्रवादीने वर्चस्व मिळवले, तर एका जागेवर शिवसेनेला विजय मिळाला. कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण व करवीर मध्ये काँग्रेसचा विजय झाला. कागल व चंदगडमध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली; तर राधानगरीत शिवसेनेने भगवा फडकविला. कोल्हापूर उत्तरचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने झालेल्या पोटनिवडणुकीत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव या काँग्रेच्या तिकिटावर तब्बल 97 हजार 332 मते घेऊन विजयी झाल्या. या मतदार संघात प्रचंड ताकद पणाला लावूनही त्यांना विजय मिळवता आला नाही.

राज्यात सत्ताबदल झाला. जिल्ह्यातील शिवसेनेचे दोन्ही खासदार संजय मंडलिक व धैर्यशील माने यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करून शिंदे गटात प्रवेश केला; तर त्यापूर्वी सत्ताबदलाच्या हालचाली पडद्यामागे सुरू असताना झालेल्या राज्यसभा निवडणुकीत धनंजय महाडिक यांनी भाजपच्या तिकीटवर विजयाचा गुलाल उधळला.

आता परिस्थिती बदलली आहे. महायुती म्हणून मंडलिक, माने व महाडिक हे तीनही खासदार एकत्र आहेत. विधानसभेतील एकमेव शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर हे शिंदे गटात आहेत. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे ही शिंदे गटात आहेत. तर अलीकडेच झालेल्या सत्ता बदलात हसन मुश्रीफ व राजेश पाटील हे राष्ट्रवादीचे दोन्ही आमदार अजित पवार गटाबरोबर आहेत. आता मुश्रीफ, आबिटकर व पाटील हे महायुतीत आहेत. त्यांच्या जोडीली तीनही खासदार आहेत. तर महाविकास आघाडीकडे पी. एन. पाटील, जयश्री जाधव व ऋतुराज पाटील हे तीन आमदार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लोकसभेची जागा कोण जिंकणार?, महाविकास आघाडीचा उमेदवार कोण?, कोणाला कोणाची नाराजी भोवणार? असे अनेक प्रश्न आहेत.

Back to top button