मराठा आरक्षणासाठी आज धरणे | पुढारी

मराठा आरक्षणासाठी आज धरणे

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजातर्फे सोमवारी (दि. 2) सकाळी 11 वाजता पापाची तिकटी येथील महात्मा गांधी पुतळ्याजवळ धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, गांधी जयंतीपासून सुरू होणारे बेमुदत उपोषण स्थगित करण्याचा निर्णयही घेण्यात आला.

अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, जरांगे पाटील यांना दिलेली मुदत संपल्यानंतर राज्य शासन काय निर्णय घेते हे पाहून पुढील आंदोलनाची दिशा ठरविली पाहिजे. सध्या कुणबी, धनगर समाज उपोषणामुळे राज्य शासन गोंधळले आहे. सरकारकडून मराठा समाजाची केवळ बोळवण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी घटनादुरुस्तीद्वारे 50 टक्केची कॅब उठवली पाहिजे. मराठा समाजाचा इम्पेरिकल डेटा शासनाने गोळा करावा, भक्कम डेटा गोळा करावा. अ‍ॅड. बाबा इंदुलकर म्हणाले, मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी आता महाराष्ट्र मागास आयोग कायदा कलम 11 ची अंमलबजावणी झाली पाहीजे.

अ‍ॅड. प्रशांत देसाई म्हणाले, राज्यकर्ते उपोषणाकडे गांभीर्याने लक्ष देणार काय, बेमुदत उपोषण स्थगित करून पापाची तिकटी येथे 10 वाजता धरणे आंदोलन करू. कायद्याची लढाई करूया. उच्च न्यायालयात याचिका दाखल करूया. अ‍ॅड. शिवाजी राणे म्हणाले, दुप्पट वेगाने आंदोलन करू. कोणताही पक्ष अगर पुढार्‍यांवर विश्वास न ठेवता संघर्ष करूया. दुसर्‍या समाजाच्या आरक्षणावर न बोलता राज्याचे मंत्रिमंडळ कोल्हापुरात आले पाहिजे, असे तीव्र आंदोलन करू. अ‍ॅड. अजित मोहिते म्हणाले, जरांगे यांना दिलेल्या मुदतीत सरकार कोणती भूमिका घेते हे पाहून आंदोलनाची तीव्रता ठरवूया.

बाबा पार्टे म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीबाबत फसवले, पालकमंत्री आणि मुश्रीफ यांनी केवळ गोड बोलून फसवले. जो फसवेल त्यांच्या विरोधात आंदोलन केले जाईल. संजय पवार म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर दौर्‍यापूर्वी मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करण्यास भाग पाडले. मात्र ही बैठक झाली नाही आणि होणारही नाही. मराठा समाजास फसवण्याचे काम मुश्रीफांनी केले. कोणत्याही पक्षाचा मराठा मंत्री येवो, त्यांना समाजाने जाब विचारला पाहिजे. मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मानसिकतेत सरकार नाही. समाजास भडकविण्याचे, फसविण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे त्यांना जाब विचारण्याची वेळ आली असून आता संघर्ष करावा लागेल.

विजय देवणे म्हणाले, जरांगेंच्या दौर्‍याला राज्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुदतीत राज्य सरकार काय निर्णय घेते ते पाहूया. गांधी जयंतीदिनी धरणे आंदोलन करून जिल्ह्यात तालुकानिहाय धरणे आंदोलन करून वातावरण तापते ठेवूया. मराठा नेते आणि मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे.

किशोर घाटगे म्हणाले, वडेट्टीवार मराठा द्वेष करत असतील तर त्यांचा निषेध केला पाहिजे. जिल्ह्यातील आंदोलनासह राज्य पातळीवरील संघटनांशी समन्वय ठेवून व्यापकता वाढवूया. जयकुमार शिंदे यांनी मराठा नेत्यांनी समाजाला फसविल्याचा आरोप केला. अनिल घाटगे म्हणाले, जातीनिहाय गणना झाली असून त्याचा अंतिम अहवाल केंद्र सरकारकडे आहे. राज्य सरकारची हिंमत असेल तर तो मागून घ्यावा. त्यामुळे ओबीसींची खरी लोकसंख्या कळण्यास मदत होईल. मराठा समाजाच्या आरक्षणावर इतरांना उठवून बसविण्याचे काम सध्या सुरू आहे.

रविकिरण इंगवले म्हणाले, एकमेकावरील आरोपामुळे आरक्षणाच्या बैठकीस गालबोट नको. सगळेच नेते एका माळेचे मणी आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बैठकीत कोणत्याही नेत्यावर अथवा पक्षावर बोलू नका.

बैठकीस अ‍ॅड. गिरीश खडके, अ‍ॅड. के. के. सासवडे, आर. के. पोवार, संभाजीराव जगदाळे, उदय भोसले, विजय सावंत, वैशाली महाडिक, अमरसिंह निंबाळकर, महादेव पाटील, चंद्रकांत पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी राखली आंदोलनाची एकजूट

या बैठकीत दोन कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. यावर रविकिरण इंगवले म्हणाले, दरवेळी असे प्रकार का करता? मराठा क्रांती मोर्चावेळी दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सर्वांशी चर्चा करून आंदोलनाची एकजूट राखली. सकल मराठा समाजाचे संघटन मजबूत राहावे यासाठी डॉ. जाधव सातत्याने प्रयत्न करत आहेत. यामुळे आंदोलनाला बळ मिळत आहे, असे ते म्हणाले.

Back to top button