कसबा बावड्यात दोन गटांत हाणामारी; 3 जखमी | पुढारी

कसबा बावड्यात दोन गटांत हाणामारी; 3 जखमी

कसबा बावडा, पुढारी वृत्तसेवा : एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून कसबा बावडा येथील आंबेडकरनगर परिसरात गुरुवारी दोन गटांत हाणामारी झाली. यावेळी तलवार, चाकूने केलेल्या हल्ल्यात दोन्ही गटांकडील तिघे जखमी झाले. उपचारासाठी जखमींना सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमीतील एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

सायंकाळी शहर पोलिस उपाधीक्षक अजित टिक्के, पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी आंबेडकर उद्यान येथे येऊन घटनेची माहिती घेत तपासाबाबत पुढील सूचना दिल्या.

सुरज बाळकृष्ण कांबळे (वय 24), वैभव माजगावकर (22) हे एका गटातील तर दुसर्‍या गटातील अनिल कांबळे (20, सर्व रा. आंबेडकरनगर कसबा बावडा) अशी जखमींची नावे आहेत. यातील सुरज कांबळे याला गंभीर दुखापत झाली आहे.

आंबेडकरनगर येथील तरुणांच्या दोन गटांत दुपारच्या दरम्यान शंभरफुटी रस्त्यावर वादावादी होऊन मारामारी झाली. काही वेळानंतर दोन्ही गटांतील तरुण एकमेकांना खुन्नस देत निघून गेले. मारहाण झालेल्या दुसर्‍या गटातील तरुणांनी सदर बाजार परिसरातील काही साथीदारांना याची माहिती देऊन घटनास्थळी बोलवून घेतले. ते सर्वजण सायंकाळी पाचच्या सुमारास आंबेडकर उद्यान, आंबेडकर नगर परिसरात आले. त्यांनी दुपारी मारहाण केलेल्या तरुणांशी पुन्हा वाद घालत मारहाण केली. यावेळी तलवार, चाकूचा वापर झाला. दगडफेक झाल्याने परिसरात तणावाचे वातावरण होते.

आंबेडकरनगर येथील तरुणांच्या दोन गटांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून गेले काही महिने वाद सुरू होता. गुरुवारी झालेल्या मारामारीनंतर रात्री उशिरापर्यंत शाहूपुरी पोलिसांत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Back to top button