नियमांचे उल्लंघन केल्यास साऊंड सिस्टीम जप्त करणार; लेसरचा वापर नकाे | पुढारी

नियमांचे उल्लंघन केल्यास साऊंड सिस्टीम जप्त करणार; लेसरचा वापर नकाे

कोल्हापूर ः पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सवात ध्वनिमर्यादा पाळल्या नाहीत, तर मंडळांसोबतच साऊंड सिस्टीम, लेसर शो चालक, मालकांवर गुन्हे दाखल करून सिस्टीम जप्त केली जाणार आहे. त्यामुळे साऊंडवाल्यांनी नियमांचे पालन करावे, लेसर शोचा वापर टाळावा, अशा सूचना पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी बुधवारी दिल्या. अलंकार हॉल येथे साऊंड सिस्टीम चालक, मालकांच्या बैठकीत ते बोलत होते. तुम्ही एक दिवस पोलिसांना त्रास दिला, तर पोलिस तो सहन करतीलही; परंतु पुढचे 364 दिवस पोलिसांचेच असतील, हे लक्षात घ्या, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. नियमांचे उल्लंघन झाल्याचा गुन्हा सिद्ध झाल्यास 5 वर्षे कारावास व दंडाची कायद्यात तरतूद आहे.

पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित म्हणाले, ध्वनी यंत्रणांचे मालक मंडळांकडून भाडे घेत असले, तरी ते कायद्याला बांधिल आहेत. नियमांचे उल्लंघन करून त्यांना व्यवसाय करता येणार नाही. परवानगीपासून ते आवाज मर्यादेपर्यंत सर्वप्रकारची खबरदारी त्यांना घ्यावी लागेल. लेसर आरोग्याला घातक असल्यामुळे त्यांचा वापर करूच नये. स्ट्रक्चरची लांबी, रुंदी, आवाज, वेळ याचे उल्लंघन झाल्यास सर्व यंत्रणा जप्त करून मंडळांसह ध्वनी यंत्रणा मालक, चालक, वाहनधारक अशा सर्वांवर गुन्हे दाखल होतील.

या बैठकीत उदय गायकवाड, डॉ. आसावरी जाधव, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उदय माने यांनी मोठ्या आवाजाच्या ध्वनी यंत्रणांचे धोके स्पष्ट केले. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी पोलिस अगोदर तुम्हाला कायद्याची माहिती देत आहेत. परंतु, कायदे पाळले नाहीत तर दोषींवर कारवाई अटळ आहे, असे सांगितले.

साऊंड सिस्टीम असोसिएशनचे अध्यक्ष मुनीर मुल्ला यांच्यासह इंद्रजित ऐनापूरकर, विजय वरुटे यांनी नियमांमध्ये सवलत मिळावी, अशी विनंती केली. बैठकीसाठी अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई उपस्थित होत्या. पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी सूत्रसंचालन केले. तानाजी सावंत यांनी आभार मानले.

तुम्ही एक दिवस पोलिसांना त्रास दिला, तर पोलिस तो सहन करतीलही; परंतु पुढचे 364 दिवस पोलिसांचेच असतील, हे लक्षात घ्या.
– महेंद्र पंडित, पोलिस अधीक्षक

Back to top button