सीपीआरमध्ये संधिवातावर होणार उपचार | पुढारी

सीपीआरमध्ये संधिवातावर होणार उपचार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात आता संधिवाताच्या आजारावरही उपचार सुरू होणार आहेत. त्यासाठी स्वंतत्र बाह्यरुग्ण विभाग सुरू केला जाणार असून, आठवड्यातून एकदा बाह्यरुग्ण विभागात रुग्णांना तपासून त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात 30 हून अधिक विभाग आहेत. या विभागांतर्गत नवनवीन आजारांवर तसेच पारंपरिक आजारावर देखील उपचार केले जातात. सीपीआर हे 650 बेडचे रुग्णालय आहे. जिल्ह्यातून आणि शेजारच्या जिल्ह्यांतूनही येथे अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. सध्याचा काळ हा स्पेशलायझेशनचा आहे. तसे डॉक्टरर्सही आपल्याकडे उपलब्ध आहेत; पण संधिवातासारखा आजार अनेक रुग्णांना जडला आहे. अनेक रुग्ण उपचारांअभावी वेदना सहन करत आहेत. खासगी रुग्णालयात याचे उपचार हे महागडे आहेत. औषधेही महाग आहेत. खासगी रुग्णालयातील हे उपचार सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या सेवेची सीपीआरमध्ये गरज होती.

सध्या देखील सीपीआरमध्ये असे रुग्ण येत असतात. परंतु, ते वेगवेगळे डॉक्टर्स हाताळत असतात. सध्या डॉ. वासिम काझी हे डॉक्टर सीपीआरच्या मेडिसिन विभागाकडे कार्यरत आहे. त्यांचे संधिवात या विषयावर स्पेशलायझेशन झाले आहे. त्यामुळे त्यांच्याकडे हा विभाग सोपविण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात हा विभाग सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याचबरोबर सीपीआरमध्ये अंतर्गतस्राव ग्रंथी यावर देखील उपचार केले जाणार आहेत.

यासंदर्भात लवकरच सीपीआरमध्ये या दोन्हीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे. 15 ऑगस्टपासून हे विभाग सुरू होण्याची शक्यता आहे.

Back to top button