कोल्हापूर : वैरणीची कुट्टी करत असताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : वैरणीची कुट्टी करत असताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू

कसबा वाळवे; पुढारी वृत्तसेवा : चांदेकरवाडी (ता .राधानगरी) येथील तरुण शेतकरी विकास दिनकर खोत (वय ३७) याचा कडबा कुट्टी मशीनवर वैरणीची कुट्टी करत असताना विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. कष्टाळू तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याने चांदेकरवाडीसह कसबा वाळवे पंचक्रोशीवर शोककळा पसरली आहे.

विकास खोत हा सकाळी जनावरांसाठी कडबा कुट्टी मशीनवर वैरणीची कुट्टी करत बसला होता. यावेळी त्याला विजेचा जोराचा धक्का बसला. बाहेर खेळणाऱ्या मुलांच्या निदर्शनास ही बाब येताच त्यांनी आरडाओरडा केला. ग्रामस्थांनी तातडीने त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विकास पशुपालनाबरोबर दुचाकी रिपेअरीचे काम करत होता. तो पाचवी इयत्तेत शिकत असताना वडीलांचा मृत्यू झाला होता. काही वर्षांनंतर आईचेही निधन झाले होते. फक्त दोन गुंठे शेती असताना दुचाकी दुरुस्ती आणि पशुपालन व्यवसायातून त्याने प्रगती केली होती.

हेही वाचलंत का ? 

Back to top button