खेड येथील आमदारांच्या कॉलनीत बिबट्याचा वावर | पुढारी

खेड येथील आमदारांच्या कॉलनीत बिबट्याचा वावर

राजगुरुनगर : पुढारी वृत्तसेवा :  खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचे निवासस्थान असलेल्या राजगुरुनगरच्या वाडा रोड परिसरात मंगळवारी (दि. 8) पहाटे बिबट्याने धुमाकूळ घातला. शहरालगतच्या सातकरस्थळ ग्रामपंचायत हद्दीतील वाडा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात श्रीमान सोसायटीत राजगुरुनगर न्यायालयाचे सरकारी वकील अ‍ॅड. गिरीश कोबल राहतात. त्यांच्या घराच्या अंगणात पहाटे दोन वाजता सात मिनिटे बिबट्या थांबून होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
मुळात या परिसरात बिबट्याचा वावर असल्याने नागरिक भयभीत आहेत.

अनेकांना बिबट्याचे दर्शन झाल्यावर वन विभागाने किवणेमळा परिसरात आठ दिवसांपूर्वी पिंजरा लावला. बिबट्याने मात्र तिकडे न फिरकता विरुद्ध बाजूच्या कॉलनीत मोर्चा वळविल्याचे समोर आले आहे. मागील आठवड्यात शेतकरी दत्तोबा सातकर यांना बिबट्या सामोरा गेला होता. भीतीचे वातावरण असताना ही घटना समोर आल्याने येथील रहिवासी, शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण आहे.
सरकारी वकील अ‍ॅड. गिरीश कोबल यांच्या घराच्या व्हरांड्यात मंगळवारी पहाटे दोन वाजता बिबट्या आला. साडेचार फुटांची भिंत आणि त्यावर दीड फुटाचे लोखंडी पाइप असतानाही त्यावरून बिबट्याने अंगणात उडी मारत प्रवेश केला. यात बिबट्याचा सहा मिनिटांचा वेळ गेला. त्यानंतर बिबट्याने अंगणात असलेल्या कुत्र्याला जबड्यात पकडले.

पण, कुत्र्याच्या गळ्यात कातडी पट्टा असल्याने बिबट्याला घट्ट पकड करता आली नाही. कुत्र्याने जिवाच्या आकांताने ओरडत इकडे तिकडे पळापळ केली. ओरडण्याचा आवाज ऐकू आल्यावर अ‍ॅड. कोबल हे परिवारासह जागे झाले. त्यांनी आरडाओरडा केला. त्याला बिबट्याने दाद दिली नाही. अखेर हाताला लागतील ती भांडी घेऊन कोबल व परिवाराने जोरात वाजवायला सुरुवात केली. तो आवाज ऐकून बिबट्याने जबड्यात पकडलेल्या कुत्र्याला सोडून देत धूम ठोकली. जवळपास सात मिनिटे बिबट्या या ठिकाणी होता. या सर्व घटनेचे सीसीटीव्ही कॅमेर्‍यात चित्रीकरण झाले आहे. अ‍ॅड. गिरीश कोबल यांच्या शेजारी वन विभागाचे कर्मचारी किरण मिरजे राहतात. त्यांनी राजगुरुनगर वन विभागाच्या वरिष्ठ अधिकारीवर्गाला याबाबत माहिती दिली व उपाययोजना करण्यासाठी आवाहन केले.

शहर व लगतच्या परिसरात विविध ठिकाणी बिबटे आढळत आहेत. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाला सूचना केल्यावर पिंजरा लावून पकडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. आम्ही राहत असलेल्या एका कॉलनीत पिंजरा लावला आहे. विरुद्ध बाजूला असलेल्या अ‍ॅड. कोबल यांच्या घरी बिबट्या आढळला.
वन विभागाला गस्त घालण्यासाठी सांगण्यात आले आहे.
                                                              – दिलीप मोहिते पाटील, आमदार, खेड

Back to top button