कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांत 74 टीएमसी पाणीसाठा | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांत 74 टीएमसी पाणीसाठा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील प्रमुख धरणांत 30 जुलै पर्यंत 74.06 टीएमसी पाणीसाठा झाला. गतवर्षी याच दिवसांपर्यंत झालेल्या पाणीसाठ्याच्या तुलनेत यावर्षी 5 टीएमसी जादा पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी 69.25 टीएमसी साठा झाला होता.

यावषी जुलै महिन्यात दमदार पाऊस झाला. जिल्ह्यातील धरणांत यावर्षी एकूण क्षमतेच्या 80.71 टक्के पाणीसाठा झाला आहे. गतवर्षी याच दिवसांत एकूण क्षमतेच्या 75.46 टक्के साठा झाला होता. राधानगरी, दूधगंगा, वारणा, तुळशी आणि पाटगाव या प्रमुख पाच धरणांत 59.57 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्यातील बहुतांश सर्वच धरणे येत्या 15 ते 20 दिवसांत पूर्ण क्षमतेने भरतील अशी शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या वर्षी जुलै महिन्यात कोदे, जांबरे आणि जंगमहट्टी ही तीनच धरणे पूर्ण क्षमतेने भरली होती. यावर्षी मात्र राधानगरी, कडवी, कोदे, जांबरे आणि घटप्रभा ही पाच धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. राधानगरी भरल्याने कोल्हापूरच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

गतवर्षीच्या तुलनेत सरासरी 342 मि.मी.जादा पाऊस

जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 30 जुलैपर्यंत धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सरासरी 342 मि. मी.जादा पाऊस झाला आहे. प्रमुख 15 धरणांत यावर्षी एकूण 36 हजार 275 मि.मी.पाऊस कोसळला. गतवर्षी याच कालावधीत 31 हजार 143 मि.मी. पाऊस झाला होता.

गतवर्षीच्या तुलनेत धरणे 5.25 टक्के जादा भरली

जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. यामुळे जिल्ह्यातील धरणे गतवर्षीच्या तुलनेत 5.25 टक्के जादा भरली आहेत. गतवर्षी जिल्ह्यातील धरणे 30 जुलैपर्यंत सरासरी 75.46 टक्के इतकी भरली होती. यावर्षी ती 80.71 टक्के इतकी भरली आहेत.

15 दिवसांपासून चांदोलीत संततधार

सरुड, पुढारी वृत्तसेवा : चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 15 दिवसांत 800 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या याच कालावधीच्या (245 मि.मी.) तुलनेत 227 टक्के अधिक पर्जन्यवृष्टी झाली आहे. यामध्ये 23 जुलै रोजी 96 मिलिमीटर सर्वाधिक पाऊस पडला. गतवर्षी 23 जुलै 2022 या दिवशी धरण क्षेत्रात 574 मिलिमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली होती. गेल्या पंधरा दिवसांत झालेल्या संततधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात 14.25 टीएमसी इतकी झपाट्याने वाढ होऊन अल्पावधीतच धरण 85 टक्के भरले आहे.

धरणातून 19 जुलैपासून वीज जनित्र गृहातून 400 क्यूसेकने सुरू असणार्‍या विसर्गात 26 जुलै रोजी वक्र दरवाजे उघडून अडीच ते तीन हजार क्यूसेकपर्यंत वाढ करण्यात आली. त्यामध्ये शुक्रवारपासून पुन्हा सुमारे 6700 ते 6800 क्यूसेकने वाढ करण्यात आली. परिणामस्वरूप 29.37 टीएमसीवर (85.36 टक्के) पोहोचलेल्या पाणीसाठ्यात 29.13 टीएमसीपर्यंत (84.67 टक्के) घट झाली, अशी माहिती वारणा प्रकल्पाचे सहायक अभियंता एम. एम. किटवाडकर यांनी दिली.

दोन महिन्यांत 33 टक्के कमीच पाऊस

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने नद्यांना पूर आला होता; मात्र जून आणि जुलै महिन्यात सरासरीपेक्षा तब्बल 33 टक्के कमीच पाऊस झाला आहे. दि. 1 जून ते दि. 30 जुलै या कालावधीत केवळ 66.9 टक्के पाऊस जिल्ह्यात बरसला आहे. यामुळे उर्वरित दोन महिन्यांत सरासरीपेक्षा जादा पाऊस झाला, तरच यावर्षी वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात जून महिन्यात सरासरीच्या केवळ 25.8 टक्के पाऊस झाला. जुलै महिन्यात काही दिवस दमदार पाऊस झाला असला, तरी जुलै महिन्याचीही सरासरी गाठलेली नाही. 1 जुलै ते 30 जुलै या कालावधीत पडणार्‍या पावसाच्या तुलनेत 89.3 टक्केच पाऊस झाला आहे. या महिन्यातही सरासरीच्या 10 टक्के कमीच पाऊस झाला आहे.

जिल्ह्यात जून ते डिसेंबर या या कालावधीत पडणार्‍या पावसाच्या तुलनेत दोन महिन्यांत 36.5 टक्केच पाऊस झाला आहे. यामुळे यंदाही जिल्ह्यात पाऊस वार्षिक सरासरी गाठण्याची शक्यता कमीच आहे.

Back to top button