कोल्हापूर : एअर होल मुजविल्यामुळे खासबागची तटबंदी धोकादायक | पुढारी

कोल्हापूर : एअर होल मुजविल्यामुळे खासबागची तटबंदी धोकादायक

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक खासबाग मैदानाची तटबंदी कमकुवत करणार्‍यांवर कारवाई करावी, अशी मागणी सर्वपक्षीय कृती समितीने पत्रकाद्वारे केली आहे. तटबंदीला भेगा पडून जवळपास 25 फूट उंचीची ही भिंत फुगली होती. तिला बाक आला होता. ही बाब अनेक कुस्तीप्रेमींनी महापालिका प्रशासन आणि स्ट्रक्चर इंजिनिअर यांच्या निदर्शनाला आणून दिली होती. पण त्यावर कोणतीच उपाययोजना झाली नाही, असेही पत्रकात म्हटले आहे.

कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी 1912 साली आशिया खंडातील एकमेव असे खासबाग कुस्ती मैदान बांधले. मैदाना सभोवताली शास्त्रोक्त पद्धतीने भक्कम दगडी तटबंदी बांधली. आतील बाजूला मातीचा भराव करून मैदानात कुठेही बसणार्‍याला सहजपणे कुस्ती दिसेल अशी रचना केली. बाह्य तटबंदी इतकी विचारपूर्वक आणि शास्त्रीय पद्धतीने बांधली होती की, आतील भरावाचा दगडी तटबंदीवर गॅस, हवा, पाणी याचा दाब येऊ नये म्हणून प्रत्येक तीन ते साडेतीन फुटांवर छिद्रे (एअर होल) ठेवली होती. म्हणूनच 1912 ते 2015 या सुमारे शंभर वर्षांत तटबंदीचा एक टवकाही निघाला नव्हता.

2015 साली राज्य शासनाने राजर्षी शाहूंची ही वास्तू म्हणजे कुस्ती मैदान व केशवराव भोसले नाट्यगृह या वास्तूंच्या नूतनीकरणासाठी 10 कोटी रुपये निधी दिला. निधी मिळाल्यावरच कुस्ती मैदान व नाट्यगृहाची अक्षरशः वाट लागली. अनावश्यक बदल करून वास्तू कमकुवत केली. यावेळी कथित हेरिटेज कमिटी कोठे होती? हा संशोधनाचा विषय आहे. वास्तविक, निधीचा सुयोग्य व आवश्यक वापर करून या वास्तू अधिकाधिक सुस्थितीत ठेवल्या पाहिजेत.

तटबंदी कोसळून मानवी जीव गेला याला महापालिका प्रशासन, संबंधित नूतनीकरण करणारे आर्किटेक्ट आणि बांधकाम ठेकेदारच जबाबदार आहेत. कारण शाहूकालीन या मैदानाची तटबंदी बांधताना संपूर्ण तटबंदीला बांधकामात तीन-साडेतीन फुटांवर आठ बाय सहा इंच व्यासाची छिद्रे ( एअर होल ) ठेवली होती. पण दहा कोटीतील तीन-चार कोटी या कुस्ती मैदानावर उधळपट्टी करण्यासाठी बाह्य तटबंदीला आवश्यकता नसताना फक्त दर्जा भरण्याचे काम करतानाही एअर होल मुजविली. त्यामुळेच आता तटबंदीला लागून असणार्‍या मातीच्या भरावातून पावसाच्या पाण्यामुळे तटबंदीच्या दगडी भिंतीवर दाब येऊन ही तटबंदी ढासळली, असेही अशोक पोवार, रमेश मोरे यांनी पत्रकात म्हटले आहे.

Back to top button