पंचगंगा इशारा पातळीवर | पुढारी

पंचगंगा इशारा पातळीवर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ सुरूच असून रविवारी मध्यरात्री पंचगंगेने 39 फूट ही इशारा पातळी गाठली. शहरासह जिल्ह्यात पूरस्थितीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाणी पातळीत सतत वाढ सुरू असल्याने संभाव्य महापुराच्या धोक्याने पूरप्रवण भागातील नागरिक, जनावरांचे स्थलांतर सुरू झाले आहे. व्यापार्‍यांनीही साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे.

जिल्ह्यात रविवारीही पावसाचा जोर कायम राहिला. शहर आणि परिसरात दुपारनंतर पावसाने उसंत घेतल्याने उघडीप मिळाली. काही काळ शहर आणि परिसरात सूर्यदर्शनही झाले. मात्र, जिल्ह्यात विशेषत: धरण क्षेत्रात पावसाचे धूमशान सुरूच होते. कोल्हापूर-गगनबावडा हा मार्ग बंदच आहे. मांडुकलीवर शनिवारी पाणी आले होते. त्यापाठोपाठ आज लोंघेजवळ पाणी आले आहे. पर्यायी मार्गावरही गवशी बंधार्‍यावर पाणी असल्याने गगनबावडामार्गे कोकणात जाणारी वाहतूक राधानगरी-फोंडा घाट मार्गे वळवण्यात आली आहे. निपाणी-राधानगरी या आंतरराज्य मार्गावरही मुरगूडजवळ पाणी आले आहे. चंदगड तालुक्यातील कानूर खुर्द ते कानूर बुद्रुक दरम्यान रात्री पाणी आल्याने बेळगाव-वेंगुर्ला वाहतूक बंद करण्यात आली. कोल्हापूर-कळे मार्गावर मरळीजवळ रात्री पाणी आले. मात्र त्यातून वाहतूक सुरू होती. सोमवारी पाणी पातळी वाढल्यास कोल्हापूर-कळे या मार्गावरील वाहतूकही बंद होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील 80 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. यासह नद्यांचे पाणी रस्त्यावर आल्याने जिल्ह्यातील एक राष्ट्रीय महामार्ग, 8 राज्य मार्ग, 17 प्रमुख जिल्हा मार्ग, 12 इतर जिल्हा मार्ग व 17 ग्रामीण मार्ग असे एकूण 55 मार्ग बंद आहेत. त्यावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यातील दोनशेहून अधिक गावांचा एकमेकांशी असलेला थेट संपर्क तुटलेलाच आहे.

पंचगंगेची पातळी रविवारी सकाळी सात वाजता 37.2 फूट होती. अवघ्या आठ तासांत फूटभर पाणी वाढले. पाणी पातळीत दोन दिवसांच्या तुलनेत वेगाने वाढ सुरू होती. रात्री दहा वाजता पंचगंगेची पातळी 38.8 फुटावर गेली. मध्यरात्री 12 नंतर पंचगंगेने इशारा पातळी गाठली. पंचगंगेचे पाणी शुक्रवार पेठेतील गायकवाड वाड्याच्या पुढे आले. यामुळे पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून गंगावेश-शिवाजी पूल हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला. सायंकाळी पूर पाहण्यासाठी परिसरात प्रचंड गर्दी झाली होती. गायकवाड वाडा परिसरात पोलिस कोणालाही येऊ देत नव्हते. शिवाजी पूल नागरिकांनी गजबजून गेला होता. परिसरात वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. शिवाजी पुलापासून तोरस्कर चौक ते अगदी जुना बुधवार पेठ, सोन्या मारुती चौकापर्यंत आणि शिवाजी पूल ते वडणगे पवार पाणंद पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करताना पोलिसांची अक्षरश: दमछाक सुरू होती.

पाणी पातळीत वाढ सुरूच राहिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पूरप्रवण क्षेत्रातील नागरिक तसेच जनावरांचेही स्थलांतर सुरू केले आहे. स्थानिक प्रशासनानेही संबंधितांना नोटिसा बजावल्या आहेत. आंबेवाडी, चिखली परिसरातील नागरिकांनी जनावरांचे स्थलांतर सुरू केले आहे. शहरातही तावडे हॉटेल परिसरातील 60 हून अधिक नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. चंदगड तालुक्यातील कोवाड बाजारपेठेत पाणी शिरल्याने दहा दुकानगाळ्यातील साहित्य हलवण्यात आले. तांदूळवाडी (ता. पन्हाळा) 7 कुटुंबातील 29 नागरिकांसह 13 जनावरांना स्थलांतरित करण्यात आले.

जिल्ह्यातील प्रमुख 15 पैकी 14 धरण क्षेत्रात शनिवारी सकाळी सात ते रविवारी सकाळी सात या गेल्या 24 तासांत अतिवृष्टी झाली. पाटगाव धरण परिसरात तब्बल 328 मि.मी. इतक्या यावर्षीच्या आजवरच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. कोदे परिरसात 276, कुंभी परिसरात 248, राधानगरीत 211 तर घटप्रभा धरण परिसरात 207 मि.मी. इतका धुवाँधार पाऊस झाला. कासारी धरण परिसरात 196, तुळशी धरण परिसरात 180, चिकोत्रा परिसरात 160, कडवीत 117, दूधगंगा परिसरात 108 मि.मी. पाऊस झाला. वारणा परिसरात 96, जांबरे आणि चित्री परिसरात प्रत्येकी 90 मि.मी., जंगमहट्टीत 80 मि.मी. पाऊस झाला. आंबेओहळ परिसरातच अतिवृष्टी झाली नाही. या परिसरात 64 टक्के पाऊस झाला.

जिल्हयात रविवारी सकाळी 11 वाजेपर्यंत गेल्या 24 तासांत सरासरी 46.8 मि.मी.पावसाची नोंद झाली. गगनबावडा (105.4 मि.मी.) व राधानगरी (65.4 मि.मी.) या दोन तालुक्यात अतिवृष्टी झाली. भुदरगडमध्ये 62.2, चंदगड 61.8, आजर्‍यात 58.9, शाहूवाडी 55.9, पन्हाळा 53.1, करवीर 44.8, कागल 43.8, गडहिंग्लज 31.3, हातकणंगलेत 25.6 तर शिरोळ तालुक्यात 15.6 मि.मी. पाऊस झाला. कोल्हापूर शहरात गेल्या 24 तासात 53 मि.मी. पाऊस झाला.

मुसळधार पावसातही वाहतूक केली सुरळीत

रविवारी रात्री दीडच्या सुमारास देवगड – निपाणी- कलादगी या राज्य मार्गावर फोंडा घाटात झाड पडल्यामुळे वाहतूक कोंडी झाली. दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. ही माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम, वनविभाग व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचार्‍यांनी मुसळधार पावसातही घटनास्थळ गाठत पहाटे 3 वाजेपर्यंत झाड हटवत घाट मार्गातील वाहतूक सुरळीत केली.

54 घरांची अशंत पडझड

जिल्ह्यात रविवारी 30 पक्क्या तर 24 कच्च्या अशा एकूण 54 घरांची पावसाने पडझड झाल्याची जिल्हा प्रशासनाकडे नोंद झाली. आजअखेर पावसाने पक्क्या 56 घरांची अंशत: तर 138 कच्च्या घरांची अंशत: अशी एकूण 194 घरांची पडझड झाली आहे. यासह खासगी मालमत्तेचेही नुकसान झाले आहे. आजअखेर जिल्ह्यात खासगी आणि सार्वजनिक मालमत्तेचे 26 लाख 25 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. पावसाने आतापर्यंत जिल्ह्यात 2 मोठी दुधाळ, 3 लहान दुधाळ आणि एक ओढ काम करणारे अशी सहा जनावरे मृत झाली आहेत.

राधानगरी धरण 84.71 टक्के भरले

राधानगरी धरण रविवारी दुपारी चार वाजेपर्यंत 84.71 टक्के भरले. धरणात 7.08 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास मंगळवार-बुधवारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरून त्याचे स्वयंचलित दरवाजे खुले होण्याची शक्यता आहे. वारणा धरण 71.80 टक्के, दूधगंगा 44.50 टक्के, कासारी 78.54 टक्के, कडवी 78.85 टक्के, कुंभी 78.38 टक्के तर पाटगाव धरण 62.91 टक्के भरले आहे. कुंभी धरणात पाणीसाठा वाढू लागल्याने रविवारी दुपारनंतर धरणातून 400 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

Back to top button