कोल्हापूर : मनपा कर्मचार्‍यांची दिवाळी बिनपगारी | पुढारी

कोल्हापूर : मनपा कर्मचार्‍यांची दिवाळी बिनपगारी

कोल्हापूर : सतीश सरीकर

दिवाळी… श्रीमंत असो किंवा गरीब, सर्वजण आपापल्या परीने उत्साहात हा सण साजरा करणारच… वर्षातला सर्वात मोठा सण असल्याने सरकारी आणि खासगी कंपन्याही कर्मचार्‍यांना दिवाळीच्या अगोदरच पगार देतात… हर्षोल्हासाचा हा सण सर्वांनी आनंदात साजरा करावा हाच त्यामागे हेतू असतो… चार दिवसांवर दिवाळी आल्याने अनेकांनी खरेदी उरकली… फराळालाही सुरुवात झाली… गल्लीबोळात दिवाळीची धामधूम सुरू असताना महापालिका कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय मात्र केविलवाण्या नजरेने पाहत बसले आहेत… इतिहासात पहिल्यांदाच महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी बिनपगारी साजरी होत आहे… तसलमातही (अ‍ॅडव्हान्स) मिळाली नसल्याने शेजार्‍यापाजार्‍यांकडे पाहत बसण्याशिवाय कर्मचार्‍यांच्या पोराबाळांना गत्यंतर उरलेले नाही… कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांचे डोळे तसलमात व पगाराकडे लागले आहेत. महापालिका कर्मचारी संघाच्या कचखाऊ भूमिकेमुळे ही वेळ ओढवली असल्याचा संताप कर्मचार्‍यांतून व्यक्त होत आहे.

मनपा कर्मचार्‍यांच्या घरात ऐन सणात अंधार

दिवाळीनिमित्त अनेकांची घरे आकाशदिवे, पणत्यांनी उजळत आहेत. मात्र, कर्मचारी संघाने पगार मिळवून न दिल्याने मनपा कर्मचार्‍यांच्या घरात ऐन सणात अंधार पसरला आहे.

अख्खे शहर कोरोनाच्या धास्तीने घरात बसले असताना महापालिकेचे झाडू कामगार, सफाई कामगार, आरोग्य विभागासह सर्वच विभागांतील अधिकारी-कर्मचारी कामावर होते. जीवावर उदार होऊन अगदी निष्ठेने सेवा बजावत होते. कोरोना योद्धा म्हणून लढत होते.

परंतु; त्याच कोरोना योद्ध्यांच्या कुटुंबावर ऐन दिवाळी सणात हातावर हात ठेवून बसण्याची वेळ आली आहे. सध्या शहरात सर्वत्र उल्हासाचे आणि चैतन्याचे वातावरण आहे. मात्र, मनपा कर्मचार्‍यांना पगार नाही आणि तसलमातही मिळाली नसल्याने ते हतबल झाले आहेत.

दिवाळी साजरी करायची कशी? असा यक्षप्रश्न त्यांना सतावत आहे. कर्मचार्‍यांचे कुटुंबीय पगाराकडे डोळे लावून बसले आहेत.
मनपात चार हजारांवर अधिकारी, कर्मचारी आहेत. त्यांच्या पगारासाठी महिन्याला सुमारे 17 ते 18 कोटी रुपये लागतात.

उत्पन्नातील बहुतांश रक्कम आस्थापनावर खर्च होते. परिणामी प्रशासनाला अनुदानावरच अवलंबून राहावे लागत आहे. आतापर्यंत दिवाळी 1 तारखेला आली तरीही पुढील महिन्याचा पगार अगोदरच्या महिन्यातील 26 किंवा 27 तारखेला घेतल्याचे कर्मचार्‍यांनी सांगितले.

पहिल्यांदाच अशाप्रकारे बिनपगाराची दिवाळी साजरी करावी लागत असल्याचा संताप अनेकांनी व्यक्त केला. आता तर 1 तारखेचा पगारही 15 ते 17 तारखेनंतर होत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवायचा कसा? असा प्रश्न आहे, कर्मचार्‍यांनी उपस्थित केला आहे.

मनपा प्रशासन व कर्मचारी संघाचे पदाधिकारी यांच्यात नुकतीच बैठक झाली. त्यात चतुर्थ श्रेणीतील कर्मचार्‍यांना 12 हजार 500 रुपये, तृतीय श्रेणी कर्मचार्‍यांना व रोजंदारांना प्रत्येकी 4 हजार रुपये तसलमात देण्याचा निर्णय झाला.

पुढील अकरा महिने ही रक्कम कपात करून घेतली जाणार आहे. मात्र, दिवाळी चार दिवसांवर आली तरीही तसलमात मिळालेली नाही. पाच कोटी रुपयांची व्यवस्था प्रशासनाने केली नाही.

तसेच मनपा कर्मचारी संघाच्या पदाधिकार्‍यांनीही त्याबाबत प्रशासनाला जाब विचारलेला नाही. ठोक मानधनावरील कामगारांना तर तसलमातही मिळणार नाही.

वास्तविक चतुर्थ श्रेणी कर्मचारी, रोजंदार व ठोक मानधनचे कर्मचारीच सर्वाधिक आहेत. ठोक मानधनावरील कर्मचार्‍यांना दरमहा सुमारे 10 हजार पगार मिळतो. रोजंदारांना दिवसाला 625 रुपये दिले जातात.

पेन्शनही दिवाळीनंतरच…

महापालिकेचे सुमारे तीन हजारांवर सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. बहुतांश कर्मचार्‍यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह पेन्शनवरच चालतो. महिन्याला साधारणतः चार कोटी रु. पेन्शनपोटी महापालिकेला द्यावे लागतात. गेल्या काही महिन्यांपासून पेन्शनही वेळेवर मिळत नाही.

आता दिवाळीला तरी वेळेत पेन्शन मिळेल, या आशेवर पेन्शनर होते. परंतु; दिवाळी झाल्यावरच साधारणतः 5 ते 7 सात तारखेनंतर पेन्शन दिली जाणार असल्याचे महापालिका अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

परिणामी उधार उसनवारी करूनच पेन्शनरांना दिवाळी साजरी करावी लागेल; अन्यथा दिवाळीच्या आनंदावर पाणी फिरवावे लागणार आहे.

मनपा अधिकारी-कर्मचारी संख्या…
वर्ग 1 – 8
वर्ग 2 – 82
वर्ग 3 – 204
वर्ग 4 – 2863
रोजंदार – 485
ठोक मानधन – 270

पाणीपुरवठा कर्मचारी
वर्ग 3 – 45
वर्ग 4 – 102
रोजंदार – 151
ठोक मानधन – 33

Back to top button