AFG vs PAK : आसिफ अलीच्या तडाख्यामुळे अफगाणिस्तानचा विजयी घास हिरावला | पुढारी

AFG vs PAK : आसिफ अलीच्या तडाख्यामुळे अफगाणिस्तानचा विजयी घास हिरावला

दुबई : पुढारी ऑनलाईन

AFG vs PAK :  पाकिस्तानच्या आसिफ अलीने १९ व्या षटकात केलेली तुफानी फलंदाजी पाकिस्तानला पराभवाच्या तोंडातून बाहेर घेऊन आली. पाकिस्तानने अफगाणिस्तानचे १४८ धावांचे आव्हान १९ षटकात ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. पाकिस्तानकडून आसिफ अलीने ७ चेंडूत ४ षटकार ठोकत २५ धावा केल्या. तर कर्णधार बाबर आझमने संयमी ५१ धावांची अर्धशतकी खेळी करत विजयाचा पाया रचला. अफगाणिस्तानकडून राशीद खान आणि मोहम्मद नबीने प्रभावी फिरकी मारा करत पाकिस्तानला अडचणीत आणले होते. राशीदने २ विकेट घेतल्या. पाकिस्तानने या विजयाबरोबर सेमी फायनलमधले स्थान पक्के केले.

अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तान सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने खराब सुरुवातीनंतरही पाकिस्तानसमोर १४७ धावा केल्या. याच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या पाकिस्तानची पहिली विकेट स्वस्तात गेली. मुजीबने धोकादायक मोहम्मद रिझवानला ८ धावांवर बाद केले.

रिझवान बाद झाल्यानंतर कर्णधार बाबर आझम आणि फखर जमान यांनी पॉवर प्लेमध्ये चांगल्या वेगाने धावा करण्याची रणनिती अवलंबली. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये ३८ धावा केल्या. जमान आक्रमक फलंदाजी करत होता तर बाबर आझम सावध फलंदाजी करत त्याला साथ देत होता. या दोघांनी १० षटकात पाकिस्तानला ७२ धावांपर्यंत पोहचवले.

दरम्यान, अफगाणिस्तानचा हुकमी एक्का राशीद खान गोलंदाजीला आला होता. त्याने टिच्चून मारा करण्यास सुरुवात केली. दुसऱ्या बाजूने कर्नधार नबीने फखर जमानला ३० धावांवर बाद करत बाबर आणि जमानची ६३ धावांची भागीदारी तोडली. त्यानंतर आलेला मोहम्मद हाफीजला राशीद खानने १० धावांवर बाद करत पाकिस्तानला तिसरा धक्का दिला.

या धक्यातून सावरण्याची जबाबदारी कर्णधार बाबर आझम आणि अनुभवी शोएब मलिक यांच्यावर होती. मलिकने आक्रमक फटके मारत धावा आणि चेंडूतील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बाबर आझमने आपले अर्धशतक पूर्ण केले. पण, राशीद खानने बाबर आझमचा ५१ धावांवर त्रिफळा उडवत पाकिस्तानला चौथा आणि मोठा धक्का दिला.

आता पाकिस्तानला १८ चेंडूत विजयासाठी २६ धावांची गरज होती. १८ वे षटक टाकणाऱ्या नवीन – उल – हक अनुभवी शोएब मलिकला १९ धावांवर बाद केले. या षटकात नवीन – उल – हकने फक्त २ धावा दिल्याने सामना आता १२ चेंडूत २४ धावा असा अवघड झाला. सामन्याचे

१९ वे षटक टाकण्याची जबाबदारी करीम जनतवर होती. मात्र पहिल्याच चेंडूवर आसिफ अलीने षटकार मारत दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. पुढचा चेंडू करीमने निर्धाव टाकला. पण, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा आसिफ अलीने षटकार मारून सामना ९ चेंडूत १२ धावा असा जवळ आणला. करीमने पुन्हा पुनरागमन करत चौथा चेंडू निर्धाव टाकला. पुन्हा एकदा करीमने चूक केली आसिफने पुन्हा चेंडू मैदानाबाहेर फिराकावत सामना ७ चेंडूत ६ धावा असा आणला. आसिफने करीमच्या शेवटच्या चेंडूवर पुन्हा एक षटकार मारत सामना एक षटक आणि पाच गडी राखून जिंकला. आसिफने ७ चेंडूत ४ षटकार ठोकत २५ केल्या.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानची सुरुवात खराब झाली. त्यांनी पॉवर प्ले संपायच्या आतच ३९ धावात ४ विकेट गमावल्या. त्यांच्या येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाने आक्रमक फटके मारण्याचे प्रयत्न केले आणि याच प्रयत्नात त्यांनी आपली विकेट गमावली.

AFG vs PAK : कर्णधार नबी ठरला तारणहार

अखेर करीम जनत आणि नजिबुल्लाने अफागणिस्तानचा डाव सारवण्याचा प्रयत्न केला. या दोघांनी अफगाणिस्तानला ८ षटकात ६० धावांपर्यंत पोहचवले. ही जोडी पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरणार असे वाटेत असतानाच इमाद वासिमने करीमला १५ धावावर बाद केले. त्यानंतर २२ धावा करणारा नजिबुल्लाही शादाब खानच्या गोलंदाजीवर बाद झाला.

१३ षटकात ७६ धावात ६ फलंदाज बाद झाल्यानंतर कर्णधार नबी आणि गुलबदीन यांनी भागीदारी रचण्यास सुरुवात केली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ४३ चेंडूत नाबाद ७१ धावांची आक्रमक भागीदारी करत अफगाणिस्तानला दिडशेच्या जवळ पोहचवले. नबीने ३२ चेंडूत नाबाद ३५ धावांची तर गलबदीनने २५ चेंडूत ३५ धावांची नाबाद खेळी केली. या दोघांच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे अफगाणिस्तान १३ षटकात ६ बाद ७६ वरुन २० षटकात ६ बाद १४७ धावांपर्यंत पोहचला.

Back to top button