सीपीआरला पंचतारांकित दवाखाना बनवणार : हसन मुश्रीफ | पुढारी

सीपीआरला पंचतारांकित दवाखाना बनवणार : हसन मुश्रीफ

गडहिंग्लज, पुढारी वृत्तसेवा : गोरगरीब रुग्ण सध्या सीपीआरमध्ये उपचार घेत असून त्यांनाही खासगी दवाखान्याप्रमाणे अतिउच्च दर्जाची सेवा व उपचार मिळावेत यासाठी सीपीआरला पंचतारांकित दवाखाना बनवणार असून राज्यातून सर्व लोक हा दवाखाना पहायला येतील, असा विकास करू, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. गडहिंग्लजमध्ये आयोजित सत्कारप्रसंगी ते बोलत होते. मुश्रीफांचे स्वागत करताना जेसीबीद्वारे फुले उधळत मुश्रीफ व आ. राजेश पाटील यांची मिरवणूक काढली.

ना. मुश्रीफ म्हणाले, ‘ईडी’ला घाबरून सत्तेत गेलो असे म्हणणार्‍यांना काही माहीत नसून भाजपसोबतच्या चर्चा यापूर्वीच 2014, 2019 ला झाल्याच होत्या. याशिवाय ईडीने कारवाई करण्यासारखे माझ्याकडे काहीच नसल्याने न्यायालयानेही मला दिलासा दिला आहे. गोडसाखर चालवण्यासाठी केलेले सहकार्य व शेतकर्‍यांसाठी उभारलेला सेनापती कारखाना या दोन्हींसाठीच ‘ईडी’ची चौकशी केली.

आ. राजेश पाटील म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार व ना. मुश्रीफ यांनी चंदगड विधानसभा मतदारसंघासाठी कोट्यवधींचा निधी दिला. मतदारसंघातील उर्वरित विकासकामे पूर्ण करण्यासाठी अजित पवार यांच्यासोबत गेलो. विधानसभा निवडणुकीवेळी ना.मुश्रीफ यांनी सहकार्य केल्यानेच आमदार होऊ शकलो असून यापुढील काळात त्यांचाच शब्द प्रमाण मानून काम करणार आहे. चंदगडमध्येही राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून अजित पवारांचे हात बळकट करूया.

स्वागत गुंडू पाटील यांनी तर प्रास्ताविक सिद्धार्थ बन्ने यांनी केले. यावेळी माजी जि.प. उपाध्यक्ष सतीश पाटील, माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे, किरण कदम, मनसेचे नागेश चौगुले यांनी मनोगते व्यक्त केली. आभार डॉ.किरण खोराटे यांनी मानले. कार्यक्रमास राष्ट्रवादीसह भाजप, शिंदे गट तसेच काँग्रेस, जनसुराज्य पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

लग्नातही एवढी वरात नव्हती

आ. राजेश पाटील यांनी कार्यकर्त्यांनी काढलेल्या जंगी मिरवणुकीचा दाखला देत माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती, अशी मिश्कील टिपणी केली. यावर ना. मुश्रीफांसोबत राहिलात तर अशा अनेकदा वराती होतील, असेही कार्यकर्त्यांनी सांगून ना.मुश्रीफ व आ.पाटील यांची गट्टी फिक्सच केली.

ना. मुश्रीफांची शेरोशायरी

आजच्या कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी ना.मुश्रीफांची स्तुतीपर शेरोशायरी केली होती. ना.मुश्रीफ भाषणाला उभारल्यानंतर त्यांनीही अत्यंत आनंदामध्ये शेराशायरी करत ‘मैं मिटनेवाला नाम नही हू’ असा आशयच लोकांसमोर ठेवला.

Back to top button