Kolhapur News: अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी चंदगड बंद; जमावाच्या मारहाणीत वृद्ध गंभीर जखमी | पुढारी

Kolhapur News: अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी चंदगड बंद; जमावाच्या मारहाणीत वृद्ध गंभीर जखमी

चंदगड: पुढारी वृत्तसेवा: चंदगड बाजार पेठेतील (Kolhapur News) एका घड्याळाच्या दुकानात मावशीबरोबर घड्याळ घेण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलीचा वृद्ध दुकान मालकाने विनयभंग केला. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर मोठा जमाव जमला आणि ‘त्या’ वृद्धाची यथेच्छ धुलाई केली. या मारहाणीत त्याचा एक पाय आणि हात फॅक्चर झाला. ही घटना रविवारी (दि.२) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान आज (दि.३) चंदगड शहर तसेच पाटणे फाट्यावरील सर्व व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला.

रविवारी सायंकाळी चंदगडनजीक  (Kolhapur News) असलेल्या खेड्यातील एक अल्पवयीन मुलगी आपल्या मावशीबरोबर घड्याळ घेण्यासाठी आली होती. बराच वेळ झाला तरी मुलीला घड्याळ पसंत आले नाही. त्यामुळे दुकान मालकाने दुकानाच्या मागील बाजूस असलेल्या गोडावूनमधील घड्याळ दाखवण्यास मुलीला नेले. तिथे त्यांने मुलीचा हात धरून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुलगी घाबरून पळत बाहेर आली आणि आरडाओरडा केला. बघता- बघता मोठा जमाव जमला आणि त्या दुकान मालकाला बेदम मारहाण केली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. या प्रकरणी त्याने माफी मागून गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.

Kolhapur News : हिंदू सेनेच्यावतीने शहर बंद

या घटनेचे पडसाद तालुक्यातील सर्वच गावांत उमटले. अशा प्रवृत्तीला ठेचण्याची गरज आहे. अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ‘हम सब एक है, अशा निषेधाच्या घोषणा देत शहर कडकडीत बंद ठेऊन घटनेचा निषेध केला.

मुलीने फिर्याद मागे घेतली

पीडित मुलगी मावशीच्या घरी राहते. ती आठवीच्या वर्गात आहे. तिला आई, वडील, भाऊ, बहीण कोणीच नसल्याने ती मावशीच्या घरी राहते. प्रथमतः मावशीने पोलीस ठाण्यात दिलेली फिर्याद मागे घेतली. आपल्याला आई, वडील, भाऊ कोणीही नसल्याने तक्रार मागे घेतल्याचे मुलीने सांगितले. दरम्यान, आज पुन्हा रवळनाथ मंदिराच्या सभागृहात मोठा जमाव जमला. संपूर्ण शहर पीडित मुलीच्यामागे राहिल, असा विश्वास देत फिर्याद दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. डीवायएसपी यांच्यासह पोलीस निरीक्षक संतोष घोळवे यांनी लोकांनी कायदा, सुव्यवस्था राखावी. कायदा मोडणाऱ्या व्यक्तीला कडक शासन केले जाईल, असा इशारा दिला.

बेंदूर सणावर ‘बंद’ चे सावट

आज महाराष्ट्रीयन बेंदूर सण चंदगड तालुक्यातील किणी- कर्यात भाग वगळता सर्वच गावांमध्ये उत्साहात साजरा केला जातो. सणाचा खास मेनू मांसाहार असतो. चंदगड शहर आणि पाटणे फाटा बाजारपेठ बंद राहिल्याने मटण दुकानेही बंद होती. त्यामुळे ऐन सणात लाखोंची उलाढाल ठप्प झाली.

हेही वाचा 

Back to top button