Ajit Pawar Latest News: सोलापूर: राष्ट्रवादी कार्यालयातील अजित पवारांचा फोटो हटवला | पुढारी

Ajit Pawar Latest News: सोलापूर: राष्ट्रवादी कार्यालयातील अजित पवारांचा फोटो हटवला

सोलापूर: पुढारी वृत्तसेवा: अजित पवार (Ajit Pawar Latest News) यांच्या बंडाचे पडसाद उमटू लागले आहेत. सोलापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयातील अजित पवार यांचा फोटो आज (दि.३) हटविण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली.

सोलापूर शहर पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची पक्ष कार्यालयात बैठक झाली. बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठीशी राहण्याचा एकमुखी ठराव करून मान्यता देण्यात आली. यावेळी तरुण कार्यकर्त्यांनी संतप्त होत शहर कार्यालयातील आमचे नेते अजित पवार असा नामोल्लेख असलेला फोटो काढण्याची मागणी केली. यावेळी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी तरुण कार्यकर्त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरुणांची आक्रमकता पाहून अखेर अजित पवारांचा फोटो काढण्यात आला. यावेळी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी (Ajit Pawar Latest News) केली.

दरम्यान, शहर अध्यक्ष भारत जाधव आणि महेश गादेकर म्हणाले की, कालपर्यंत अजित पवार आमचे नेते होते. मात्र, त्यांनी शपथ घेताच आमचा संबध संपला. ते राष्ट्रवादीचे नेते नाहीत. आमचे फक्त एकमेव विश्वासार्हता असलेले नेते शरद पवार आहेत. आम्ही सर्वजण त्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी माजी महापौर जनार्दन कारमपुरी, शंकर पाटील, मनोहर सपाटे, प्रमोद गायकवाड, सुनीता रोटे, प्रशांत बाबर, बिज्जू प्रधाने, चंद्रकांत पवार, दीपक राजगे, सुभाष डांगे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, अलिकडे पक्षात दाखल झालेले माजी महापौर महेश कोठे, ॲड. यू. एन. बेरिया, सुधीर खरटमल हे यावेळी गैरहजर राहिले.

हेही वाचा 

Back to top button