विशाळगडावर बकरी ईदची कुर्बानी व ईद साजरी न करण्याचा निर्णय | पुढारी

विशाळगडावर बकरी ईदची कुर्बानी व ईद साजरी न करण्याचा निर्णय

विशाळगड : पुढारी वृत्तसेवा : विशाळगड मुस्लिम बांधवांनी बकरी ईद व उरूस काळात कुर्बानी करणेकरिता पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक यांच्याकडे परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र परवानगीचा आदेश न मिळाल्याने विशाळगडावर बकरी ईदची कुर्बानी व ईद साजरी न करण्याचा निर्णय गडावरील मुस्लिम बांधवांच्या वतीने बुधवारी रात्री उशिरा बैठकीत घेण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी, विशाळगडावर शेकडो वर्षांपासून कोंबडे व बकरे यांची मलिक रेहान मिरांसाहेब बाबासाठी कुर्बाणी देणेची व भाविक व गरिबांना महाप्रसाद वाटप करण्याची परंपरा आहे. असे असताना प्रशासनाने विशाळगडावर कोंबडे व बकरे यांची कुर्बाणी देणेस मज्जाव केल्याने दर्गा ट्रस्टच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. त्याची सुनावणी ५ जुलैला आहे. गडावर पशु हत्या करणेस पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. याबाबत न्याय प्रलंबित आहे. दरम्यान आज (दि. २९) बकरी ईद व त्याच्या दुसऱ्या दिवसांपासून तीन दिवस मलिक रेहान उरूस असल्याने या चार दिवसाच्या काळात कुर्बानी देण्याची मागणी दर्गा ट्रस्टी तसेच गडावरील मुस्लिम बांधवांनी केली होती. मात्र उच्च न्यायालयाने याचिका कर्त्यांना सहाय्यक संचालक, पुरातत्व विभाग, पुणे यांच्याकडे परवानगी मागणीचा अर्ज करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार याचिका कर्त्यांना पुरातत्त्व विभागाकडे अर्ज केला. मात्र पुरातत्वकडून  परवानगी न मिळाल्याने मुस्लिम बांधवांमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे विशाळगडावरील ग्रामस्थांनी जोपर्यंत प्रशासनाकडून बकरी ईदची कुर्बाणी करणेस परवानगी व आदेश मिळत नाही तोपर्यंत गडावर बकरी ईदची कुर्बाणी व ईद साजरी करू नये, असा निर्णय बुधवारी रात्री झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस आयुब कागदी, इम्रान मुजावर, मनोज भोसले, मलिक मुजावर, अबूबकर मुजावर, खैरुद्दीन मुजावर, निजाम मुजावर, मुबारक मुजावर, शाहरुख मुजावर, अल्फाज मुजावर, अजीम मुजावर उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button