ऑफर सर्वांची; पण स्वतंत्रच लढणार : राजू शेट्टी | पुढारी

ऑफर सर्वांची; पण स्वतंत्रच लढणार : राजू शेट्टी

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : आपल्याला सर्वांचीच ऑफर आहे; परंतु स्वतंत्रच लढायचे ठरले आहे. लोकसभेकरिता सहा मतदारसंघ निश्चित केल्याचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दहा वर्षांपूर्वी असाच भूलभुलैया निर्माण केला होता. त्यामुळे बीआरएसचा देखील हा भूलभुलैया आहे का, हे सर्वसामान्यांनी तपासून बघण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्रातील सर्वच पक्षांच्या पदाधिकार्‍यांकडून आपल्याशी संपर्क साधण्यात आला आहे. परंतु, स्वतंत्र लढण्याची आमची भूमिका कायम आहे. हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, माढा, बुलढाणा व परभणी-धुळे हे मतदारसंघही निश्चित केले आहेत. यामध्ये आणखी एखादा वाढू शकतो, असे सांगून शेट्टी म्हणाले, सर्वांना आपला पक्ष वाढविण्याचा, मते मागण्याचा अधिकार आहे. परंतु, ज्या पद्धतीने बीआरएसचे नेते मांडणी करतात किंवा जे दिसते ते सर्वसामान्यांनी तपासून बघण्याची गरज आहे. बीआरएसला भाजपची टीम म्हणणे आताच योग्य होणार नाही.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आपणास ऑफर दिली होती. हजारो कोटींचे बजेटही निवडणुकीसाठी देतो म्हणाले होते. मात्र, मला कोणत्याही पक्षात जायचे नाही, हे मी त्यांना स्पष्ट सांगितले, असेही शेट्टी म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियान

1 जुलैपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कृषी दिनादिवशी दि. 1 जुलै पासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जागृती अभियान रायगड येथून सुरू करण्यात येणार आहे. दि. 30 सप्टेंबरपर्यंत हे अभियान चालणार आहे. आता आणि यापूर्वी सत्तेत असणार्‍यांनी शेतकर्‍यांसाठी काय केले, याचा जाब विचारण्यात येणार आहे. यासंदर्भात पुस्तिकाही प्रकाशित करण्यात येणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Back to top button