जिल्हा बँकेचे सीईओ धारेवर | पुढारी

जिल्हा बँकेचे सीईओ धारेवर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा मध्यवर्ती बँकेसमोर संचालकांच्या कारभाराविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला मंगळवारी माजी खासदार राजू शेट्टी यांनी भेट दिली. कर्जपुरवठ्यासाठी आवश्यक दाखले दिलेल्या संस्थांची माहिती देण्यास टाळाटाळ करणार्‍या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांना शेट्टी यांनी धारेवर धरले. बँक चोरांची आहे काय? ही बँक कोणाच्या मालकीची नाही. ती शेतकर्‍यांचीच आहे, अशा शब्दांत त्यांना सुनावले. यावेळी जोरदार घोषणाबाजी झाली.

अकिवाट (ता. शिरोळ) येथे नियोजित विमलनाथ चौगुले विकास सेवा सोसायटीने मागणी केलेला आवश्यक कर्जपुरवठा दाखला देण्यास बँक चार महिन्यांपासून टाळाटाळ करत आहे. या विरोधात संस्थेचे संचालक, लोकनियुक्त माजी सरपंच व स्वाभिमानीचे प्रमुख कार्यकर्ते विशाल चौगुले व कार्यकर्त्यांनी बँक प्रवेशद्वारात सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे.

या सोसायटीला गावातील तीनही सोसायटींनी नोंदणीस ना हरकत दाखला दिला आहे. परंतु, बँक संचालकांनी राजकीय आकसापोटी व सुडबुद्धीने आवश्यक कर्जपुरवठा करत असल्याचा दाखला न देण्याच्या सूचना दिल्यामुळे दाखला देण्यास प्रशासन टाळाटाळ करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

निकटवर्तीयांच्या सोसायटींना कागदपत्रांची तपासणी न करता, नियम न पाहता संचालकांच्या सांगण्यावरून कर्जपुरवठा करत असल्याचे दाखले बँकेने दिले आहेत. या प्रकाराला कंटाळून आंदोलन करत असल्याचे विमल चौगुले, अनिकेत उमाजे, देवेंद्र चौगुले, वृषभनाथ गज्जण्णावार, विद्यासागर किणिंगे, नितीन परीट, श्रेयश शेट्टी आदींनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

आंदोलकांची मंगळवारी दुपारी भेट घेतल्यानंतर शेट्टी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माने यांची भेट घेतली. या संस्थेला दाखला का देत नाही? अशी विचारणा केली. यावर डॉ. माने यांनी, नियमानुसार संबंधित संस्थेचा 1 कोटी 14 लाख कर्जपुरवठा करता येतो. दीड कोटीचा दाखला देता येत नाही, असे सांगितले. यावर शेट्टी यांनी सर्वच संस्थांना हा नियम आहे काय? का संस्था बघून तो लावता? असे दाखले दिलेल्या संस्थांची माहिती द्या, अशी मागणी त्यांनी केली. यावर डॉ. माने यांनी ती माहिती बोर्डासमोर ठेवावी लागेल, असे सांगताच शेट्टी संतप्त झाले. प्रत्येक पत्राची मूळ प्रत बँकेत असते. मला माहितीसाठी द्या. म्हणजे बँक किती नियमाने चालते हे मला अभ्यासता येईल, असे ते म्हणाले.

तुमचा बोर्ड खूप विद्वान

शेट्टी म्हणाले, तुमचे बोर्ड खूप विद्वानच आहे. त्यांना कधी सवड मिळणार? प्रशासकीय बाब असताना माहिती द्यायची की नाही. हे बोर्ड ठरविणार असेल तर काय बोलायचे? माहिती मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील. उपोषणकर्त्याचे बरे-वाईट झाले तर दुसरे आंदोलक बसतील; पण माहिती दिल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही. किती दिवसांनी माहिती देणार ते सांगा. त्याशिवाय आपणही आपल्या दालनातून उठणार नाही. यावर डॉ. माने यांनी दि. 13 जुलैपर्यंत माहिती देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी डॉ. जालंदर पाटील, वैभव कांबळे, विशाल चौगुले, सचिन शिंदे, बंडू पाटील आदी उपस्थित होते.

मग शिखर बँकेसारखं वागा

आमच्यासारखी नावडती माणसं नको असतील तर आमच्या संस्थांच्या सर्व ठेवी, डिपॉझिट परत द्या. राज्य बँकेसह दुसर्‍या बँका कर्ज देण्यास तयार आहेत, असे शेट्टी यांनी सांगताच डॉ. माने म्हणाले, ही शिखर बँक आहे, कशाला तसे करता. यावर संतप्त शेट्टी यांनी शिखर बँक आहे तर त्याप्रमाणे वागा. कर्ज देता म्हणजे उपकार करता काय? आमचा सात-बारा गहाण घेता. नाबार्ड त्याला रिफायनान्स करते, त्याचा आणि मक्तेदारीचा तुम्ही फायदा घेता, असे सुनावले.

सरकार जाण्यापूर्वी माहिती मिळेल ना?

मागितलेली माहिती किती दिवसांत देणार? या प्रश्नावर डॉ. माने शांतच राहिल्याने हे सरकार जाण्यापूर्वी मला माहिती द्याल काय? असा सवाल शेट्टी यांनी केला.

गौतमी पाटीललाही नाचवा

तुम्ही राजकारण करत बसा. कोणाला नाचवायचे ते नाचवा. गौतमी पाटीलला पण इथं आणून नाचवा. संचालकंचे मनोरंजन होईल. उगाच कशाला वाद घालायाचे, असे सांगत शेट्टी उठून गेले.

Back to top button