आगामी गळीत हंगाम खडतरच? | पुढारी

आगामी गळीत हंगाम खडतरच?

राशिवडे, प्रवीण ढोणे : जून महिना संपत आला, तरी राज्याच्या काही भागांत पावसाचा थेंब नाही. त्यामुळे उसाच्या वाढीवर परिणाम झाला असून, उसाची कमतरता भासणार आहे. कारखान्यांना ऊस विकास कार्यक्रमावर अधिक भर द्यावा लागणार आहे. आगामी गळीत हंगाम कारखान्यांना खडतर जाणार आहे.

गत हंगामामध्ये 210 सहकारी व खासगी कारखान्यांनी गळीत हंगाम घेतला. कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता 8 लाख 82 हजार 550 टन इतकी होती. यामध्ये आता एक लाख टनाने वाढ झाली आहे. परंतु, सद्य नैसर्गिक परिस्थितीचा विचार करता, यंदा उसाचे उत्पादन घटणार, असा अंदाज आहे. 210 कारखान्यांमधील किती कारखाने सुरू होतील? आणि हे कारखाने अपेक्षित गाळप करतील काय? याची शाश्वती नाही.

2021 मध्ये 173 दिवस गळीत हंगाम चालला व 1,321.5 लाख मे. टन उसाचे गाळप करून सरासरी 10.40 उतार्‍याने 1,073.60 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. 2022 मध्ये 121 दिवस हंगाम चालून सरासरी 10 टक्के उतार्‍याने 1,052.88 लाख मे. टन उसाचे गाळप होऊन 1,053.17 लाख क्विंटल साखर उत्पादित झाली. 2023-24 चा हंगाम मात्र फारच खडतर जाण्याची शक्यता आहे. हा हंगाम 80 दिवस चालेल, असा अंदाज असून, 800 लाख मे. टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे.

उसाचे जिल्हे म्हणून प्रसिद्ध असणार्‍या कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत परिपक्व ऊस तयार होणार, नाही अशी भीती आहे. त्याचा परिणाम राज्यातील गाळपासह उतार्‍यावर होणार आहे. गत दोन हंगामांमध्ये अपेक्षित गाळप होऊनही उसाला योग्य भाव मिळाला नाही. आता मात्र याउलट उसाला दर मिळण्याची शक्यता असतानाच ऊस उत्पादन घटण्याची भीती असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक तोट्यास तोंड द्यावे लागणार आहे; तर कारखान्यांचा उत्पादन खर्च, कामगार पगार, कर्जासह व्याज आदी बाबींवर खर्च होणारच आहे.

येणारा हंगाम कारखान्यांसह शेतकर्‍यांना आर्थिक धक्कादायक ठरण्याची भीती आहे. त्यामुळे ऊस उत्पादनवाढीसाठी ऊस विकास कार्यक्रम राबविणे महत्त्वाचे आहे. गावोगावी, शेताच्या बांधावर जाऊन ऊस उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन, प्रयत्न करणे गरजेचे आहे; अन्यथा गाळप कमी होऊन कारखान्यांसमोर अडचणी वाढण्याची भीती आहे.

Back to top button