अवघे कोल्हापूर शाहूमय! | पुढारी

अवघे कोल्हापूर शाहूमय!

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : ‘हिरे माणके सोने उधळा, जयजयकार करा… जय राजर्षी शाहू राजा, तुजला हा मुजरा…’ अशा अखंड जयघोषात उत्साह आणि चैतन्यदायी वातावरणात सोमवारी कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात लोकराजा राजर्षी शाहूंची जयंती साजरी झाली. विविध उपक्रमांनी अवघे कोल्हापूर शाहूमय झाले होते. भर पावसातही शाहू जयंतीचा अपूर्व उत्साह ओसंडून वाहत होता.

कसबा बावडा येथील ‘लक्ष्मी-विलास’ पॅलेस या शाहू जन्मस्थळावर शाहू जयंतीचा शासकीय सोहळा झाला. दसरा चौकातील राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले जात होते. शाहू जन्मस्थळ आणि दसरा चौकात दिवसभर सर्वसामान्य नागरिकांपासून ते विविध क्षेत्रांतील मान्यवरांची मांदियाळी होती. दीनदलितांच्या कैवार्‍यासमोर सर्वजण नतमस्तक होत अनेकजण सेल्फी घेत होते. बहुतांशी सर्वांनीच शाहू छत्रपतींचे स्टेटस लावले होते. सोशल मीडियावर दिवसभर एकमेकांना शाहू जयंतीच्या शुभेच्छा दिल्या जात होत्या.

राजर्षी शाहूंच्या विचारांचा जागर करत शहरात सकाळी फेर्‍या निघाल्या. या फेर्‍यात विविध शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते. शाहूंची वेशभूषा केलेले विद्यार्थी, हातात शाहूंच्या अलौकिक कर्तृत्वाची साक्ष देणार्‍या, त्यांनी केलेल्या कामांचे, घेतलेल्या निर्णयाचे फलक यामुळे शहरातील प्रमुख मार्गावरील वातावरण भारलेले होते. अनेक ठिकाणी शाहू जयंती सणासारखीच साजरी करण्यात आली. यामुळे अनेकजण सहकुटुंब, नवी कपडे परिधान करून अभिवादनासाठी येत होते.

शाहू खासबाग मैदानात कुस्तीची प्रात्यक्षिके, शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके, संविधानाच्या हस्तलिखित प्रतींचे वाचन, वाटप, शाहूंची दुर्मीळ छायाचित्रे, आदेश, निर्णयांचे प्रदर्शन, व्याख्यान, पोवाडे, भोजन वाटप, स्केटिंग रॅली, मोफत रिक्षा प्रवास, दिंडी, प्रभात फेर्‍या, फळ वाटप, महिलांचा सन्मान म्हणून साडी-चोळी वाटप, रक्तदान आदी विविध उपक्रमांचे शहरात आयोजन केले होते. विविध सामाजिक संस्था, संघटना, राजकीय पक्ष, सार्वजनिक आणि तरुण मंडळे, शाळा-महाविद्यालयांसह सर्व शासकीय कार्यालयांतही शाहू जयंती निमित्त प्रतिमा पूजनासह विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.

Back to top button