सीपीआरला निधी कमी पडू देणार नाही : राजेश क्षीरसागर | पुढारी

सीपीआरला निधी कमी पडू देणार नाही : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील पायाभूत सुविधा डागडुजीसाठी प्रस्तावित केलेल्या 42 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी मिळेल. कोणत्याही सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी शुक्रवारी येथे दिली. सीपीआरमध्ये आयोजित केलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

गरीब रुग्णांना हा आपला दवाखाना वाटावा, असे काम प्रशासनाकडून अपेक्षित आहे, असे सांगून क्षीरसागर म्हणाले, हे रुग्णालय अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज व्हावे, यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न करीत आहोत. विधिमंडळात प्रश्न मांडण्यापासून आंदोलनापर्यंत अशा अनेकप्रकारे सीपीआर रुग्णालय सुसज्ज करण्यासाठी प्रयत्न केला आहे. रुग्णालयासाठी बेड, सिटी स्कॅन सेंटर, ट्रॉमा केअर युनिट याद्वारे गोरगरीब रुग्णांना मोफत व माफक दरात सेवा देण्यात यशस्वी ठरलो आहे. नुकतेच मोड्यूलर ओटी मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सर्वसमावेशक काम करत असून, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आरोग्य सेवेकडे विशेष लक्ष आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक सुनील देशमुख, जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, मुख्य प्रवक्ता डॉ. अजित लोकरे, डॉ. अक्षय बाफना, डॉ. राहुल बडे, डॉ. शानबाग, डॉ. बनसोडे, कृष्णा लोंढे, अनिकेत जुगदार, अनिल माने आदी उपस्थित होते.

प्रस्ताव मंजुरीसाठी प्रयत्न करावेत : अधिष्ठाता

सीपीआरमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याप्रमाणे रुग्णसेवा गतिमान केली आहे. शासनाकडे निधी, यंत्रसामग्री, रिक्त पदे आदी समस्यांबाबत प्रस्ताव पाठवले असून मंजुरीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी अधिष्ठाता श्रीमती आरती घोरपडे यांनी केली.

Back to top button