कोल्हापूर : क्रीडानगरीला प्रतीक्षा जिल्हा क्रीडा संकुलाची | पुढारी

कोल्हापूर : क्रीडानगरीला प्रतीक्षा जिल्हा क्रीडा संकुलाची

कोल्हापूर, सागर यादव : खेळाडू घडविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा संकुलाची निर्मिती राज्य शासनाकडून सुरू आहे. मात्र, क्रीडानगरी असा नावलौकीक असणार्‍या कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप क्रीडा संकुल नसल्याचे वास्तव आहे. राज्यातील 29 जिल्ह्यांत जिल्हा क्रीडा संकुलांचे काम सुरू आहे. मात्र, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची लयलूट करणारा कोल्हापूर जिल्हाच जिल्हा क्रीडा संकुलापासून वंचित असल्याचे वास्तव आहे.

कोल्हापूरच्या क्रीडा क्षेत्राला राजर्षी शाहूंच्या पाठबळाची शतकी परंपरा लाभली आहे. पारंपरिक खेळांप्रमाणेच आधुनिक साहसी खेळांतही इथले खेळाडू राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकत आहेत. अशा खेळाडूंना प्रोत्साहन आणि पाळबळ मिळावे, क्रीडाविषयक पायाभूत सुविधा, तंत्रशुद्ध क्रीडा सुविधा निर्माण व्हाव्यात, या उद्देशाने राज्य शासनाच्या 2001 च्या क्रीडा धोरणानुसार क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने विभाग, जिल्हा आणि तालुका क्रीडा संकुलांची योजना राबवली जात आहे. प्रत्येक तालुक्यात विविध खेळांच्या किमान सुविधा, त्याचप्रमाणे जिल्हास्तरावर राष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा व विभागीय स्तरावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे.

कोल्हापूर जिल्हा याला अपवाद नाही, पाच जिल्ह्यांसाठीच्या विभागीय क्रीडा संकुलासह तालुका क्रीडा संकुलांचे काम सुरू आहे. मात्र, स्वतंत्र जिल्हा क्रीडा संकुलाचा अद्याप पत्ता नाही. विभागीय क्रीडा संकुलाचे काम गेली दोन दशके सुरूच आहे. अनेक कामे अपुरी असल्याने संकुलाचा पूर्ण वापर खेळाडूंना करता येत नाही. तालुका क्रीडा संकुलांचीही अशीच अवस्था आहे. जिल्हा क्रीडा संकुलासाठी तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी प्रयत्न केले होते. या संदर्भात व्यापक बैठक व उपलब्ध जागांची माहिती घेतली होती. त्यानुसार जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या माध्यमातून शेंडा पार्क परिसरातील जागेची पाहणी करून 16 एकर जागेवर जिल्हा क्रीडा संकुल उभारणीचा प्रस्तावही जिल्हा प्रशासनाकडे पाठवला होता. मात्र, त्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. ती मिळावी, अशी मागणी सातत्याने होत आहे.

जिल्हा क्रीडा संकुलात असणार

खुले प्रेक्षागृह : 400 मीटर धावमार्ग (मातीचा), 5 हजार प्रेक्षकांसाठी गॅलरी, हॉकी व फुटबॉल मैदान, चेंजिंग रूम, क्रीडा साहित्यासाठी जागा.

विविध खेळांची क्रीडांगणे : व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, खो-खोची दोन मैदाने, लॉन टेनिस व लोकप्रिय खेळांची अन्य मैदाने. मल्टी जीम, वेटलिफ्टिंग, फिजिकल एक्सरसाईज हॉल, फिटनेस सेंटर. जलतरण तलाव : 8 लेन्ससह 25 बाय 21 मीटर फिल्टरेशन प्लँटसह व चेंजिंग रूम. इनडोअर हॉल (मल्टिपर्पज गेम हॉल) : सागवान लाकडाचे फ्लोअरिंग, सिंथेटिक फ्लोअरिंग, आर्टिफिशियल फ्लोअरिंग, लॉन टेनिस सिंथेटिक फ्लोअरिंग, हार्ड कोर्ट, शूटिंग रेंज. मुला-मुलींसाठी वसतिगृह : 30 बेड मुलींसाठी आवश्यक (डॉरमेंटरी टाईप). याशिवाय खेळाचे साहित्य, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, विद्युतीकरण, अंतर्गत रस्ते, संरक्षक भिंत आदी गोष्टींचा समावेश जिल्हा क्रीडा संकुलात असणार आहे.

क्रीडा संकुलांसाठी भरघोस निधीची तरतूद

दि. 23 मार्च 2022 नुसार क्रीडा संकुलांच्या उभारणीसाठी राज्य शासनाने भरघोस निधीची तरतूद केली आहे. विभागीय क्रीडा संकुलाच्या नवीन बांधकामासाठी 50 कोटी, तर जुन्या बांधकामासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद आहे. जिल्हा क्रीडा संकुलाच्या नवीन बांधकामाला 25 कोटी, तर जुन्या बांधकामासाठी 15 कोटी रुपयांची तरतूद आहे. तालुका क्रीडा संकुलाच्या नवीन बांधकामाला 5 कोटी, तर जुन्या बांधकामासाठी 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती जिल्हा क्रीडा कार्यालयाकडून देण्यात आली.

Back to top button