कोल्हापूर : आरोग्य अधिकार्‍यासह लाच घेताना बाप-लेकाला अटक | पुढारी

कोल्हापूर : आरोग्य अधिकार्‍यासह लाच घेताना बाप-लेकाला अटक

कोल्हापूर/कोडोली, पुढारी वृत्तसेवा : पारगाव (ता. हातकणंगले) येथील रुग्णालयातील सेवानिवृत्त कर्मचार्‍याकडून रजा रोखीकरणाचा प्रस्ताव कोणत्याही त्रुटींशिवाय मंजूर करण्यासाठी 25 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून ती पंटरमार्फत स्वीकारल्याच्या आरोपावरून सहायक अधीक्षक मारुती परशुराम वरुटे (वय 50, रा. सुनंदा पार्क, पोतदार हायस्कूलजवळ, कोल्हापूर, मूळ गाव कासारपुतळे), वाहनचालक विलास जीवन शिंदे (57, पारगाव), पंटर शिवम विलास शिंदे (22, सरकारी हॉस्पिटल कॉलनी, पारगाव, मूळ गाव किणी) या तिघांना अटक करण्यात आली आहे. विलास शिंदे व शिवम शिंदे हे बाप-लेक आहेत.

तिघांनाही अटक करण्यात आली आहे. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहायक अधीक्षक वरुटेसह तिन्ही संशयितांच्या घरांची झडती घेतली.

तक्रारदार व्यक्ती पारगाव येथील सरकारी आरोग्य केंद्रात औषध संशोधकपदावर कार्यरत होती. निवृत्तीनंतर रजा रोखीकरणासाठी त्यांनी आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता. सहायक अधीक्षक वरुटे याच्याकडे कागदपत्रांची फाईल गेली असता त्याने कोणत्याही त्रुटींशिवाय प्रस्ताव मंजूर करण्यासाठी 30 हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती हा सौदा 25 हजार रुपयांवर ठरला. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक सरदार नाळे यांच्याकडे तक्रार केली. तक्रारदाराला पैसे घेऊन आरोग्य केंद्रात येण्यास सांगण्यात आले.

तक्रारदार पैसे देण्यासाठी वरुटे याच्याकडे गेला तेव्हा वरुटे याने चालक विलास शिंदे व पंटर शिवम शिंदे यांच्याकडे रक्कम देण्यास सांगितले. 25 हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना पथकाने पंटरसह चालकाला रंगेहाथ पकडले.

Back to top button