डिझेल दरवाढीचा झटका | पुढारी

डिझेल दरवाढीचा झटका

कोल्हापूर ; सचिन टिपकुर्ले : पेट्रोलबरोबरच डिझेल नेही शंभरी गाठल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर विपरित परिणाम होत आहे. जीवनावश्यक मालाची वाहतूक करणार्‍या ट्रक, टेम्पो, रिक्षा यांचा इंधनावर खर्च वाढत चालला असून, ही दरवाढ महागाईला निमंत्रण देणारी आहे.

कोरोना काळातील आठ महिन्यांनंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरळीत आता कुठे सुरू झाली असतानाच इंधनाचे दर वाढतच चालले आहेत. रोज बदलत चाललेल्या दरामुळे माल वाहतूक करणार्‍या ट्रकचालकांना इंधनावरील खर्चाचा ताळमेळ लावताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन वर्षांपूर्वी जेव्हा डिझेल दराने 80 रुपयांचा टप्पा ओलांडला तेव्हा ट्रक चालकांनी देशव्यापी चक्‍काजाम आंदोलन केले होते.

जून 2021 मध्ये डिझेल प्रतिलिटर 93 रुपये होते. सहा महिन्यांत या दरात आठ रुपयांची वाढ झाली आहे. आज कोल्हापुरात डिझेलचा दर 101 रुपये 14 पैसे झाला आहे. या दर वाढीचा परिणाम वाहतूक खर्चावर होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात अंदाजे पाच हजार ट्रक व टेम्पोचालक आहेत. या ट्रक व टेम्पोंमधून कोल्हापुरातून साखर, गूळ, कांदा, बटाटा हे मुंबई, गुजरात, अहमदाबाद, केरळ, कोकण भागांत पाठवले जातात. जीवनावश्यक मालाच्या वाहतुकीसाठी 14 ते 16 टायरचे ट्रक वापरले जातात. यासाठी साधारणपणे 20 हजार भाडे आकारले जाते. यात टोल, डिझेल खर्च व ड्रायव्हर भत्त्याचा समावेश आहे. वाहतूक खर्च वाढला की घाऊक बाजारातून किरकोळ बाजारपेठेत व नंतर ग्राहकांपर्यंत माल पोहोचताना त्याच्या किमती वाढत असून, महागाई वाढण्यात भर पडत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने बदल होत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलचे दर वधारल्याचे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. इंधन दरवाढीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. दळणवळणातील एस. टी., अवजड वाहने, केएमटी, ट्रक व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. डिझेल दर वाढल्याने वाहतुकीचा दर, कामगारांचा पगार आणि पर्यायाने निर्यात आणि आयात वस्तूंच्या किमतीतही वाढ झाली आहे. कृषी, उद्योग, व्यापार आणि दळणवळणावर दरवाढीचा परिणाम दिसून येत आहे. या सर्वांचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसत असून, बजेट कोलमडले आहे.

एस.टी.च्या खर्चात 40 टक्के वाढ

डिझेलने शंभरी पार केली आहे. त्याचा परिणाम सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसह मालवाहतुकीवरही झाला आहे. डिझेल दरवाढ झाली आहे; पण एस.टी.च्या प्रवासी भाड्यात वाढ झालेली नाही. त्यामुळे एस.टी. महामंडळाच्या आर्थिक संकटात आणखीन भर पडत आहे. एस.टी.च्या एकूण खर्चात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यासाठी भाडेवाढ अपरिहार्य आहे.

कोल्हापूर विभागातील एस.टी.च्या विविध मार्गावर दैनंदिन 3500 फेर्‍या होत्या. यासाठी दररोज सुमारे 50 हजार लिटर डिझेलची गरज लागते. जिथं 2 लाख रुपये लागत होते, त्या ठिकाणी आता अडीच ते पावणेतीन लाख रुपये खर्च होत आहेत. अगोदरच एस.टी. अडचणीत आहे. त्यातच आता डिझेल दरवाढीमुळे आणखी भर पडली आहे. डिझेल दरवाढ झाल्याने एस.टी.च्या खर्चात 40 टक्के वाढ झाली आहे.

केएमटीच्या तोट्यात भर

इंधन दरात वाढ झाल्याने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अडचणीत आली आहे. शहराची रक्तवाहिनी असणार्‍या केएमटीला डिझेल दरवाढीचा चांगलाच फटका बसत आहे. मुळात नादुरुस्त बसेसमुळे उत्पन्नात घट आली असताना आता डिझेल दरवाढीचा फटकाही सहन करावा लागत आहे.

कोरोनामुळै गेल्या दोन वर्षांत केएमटीचा मोठ्या प्रमाणात तोटा झाला आहे. सर्वच बसेस थांबून राहिल्याने उत्पन्नाचा मार्ग खुंटला. मात्र, कोरोना संसर्ग कमी झाल्याने काही मार्गावर बसेस सुरू केल्या आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार बसेसचे नियोजन होत नाही. परिणामी, अनेक मार्गावर उपलब्ध बसेसची संख्या रोडावली आहे.

उद्योगांना फटका

कोल्हापूर : गोशिमा, स्मॅक आणि मॅक तसेच इचलकरंजी येथील औद्योगिक वसाहतीतून मोठ्या प्रमाणात मालाची राज्?यांतर्गत वाहतूक होते. वाहतुकीसाठी मोठ्या ट्रकचा वापर केला जातो. हजारो किलोमीटरपर्यंत कोल्हापूरच्या उद्योग क्षेत्रातून वाहनांचे आणि फौंड्रीचे पार्ट जातात. डिझेल च्या वाढत्या दरामुळे वाहतुकीच्या खर्चात वाढ होणार आहे. यामुळे उद्योगांचे बजेट वाढत चालले आहे.

शेतीची मशागत महागली

कोल्हापूर : डिझेलच्या दरवाढीचा शेतीच्या मशागतीवर परिणाम झाला आहे. ट्रॅक्टरच्या नांगरटीमध्ये एकरी एक हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय ट्रॅक्टरचालकांनी घेतला आहे. रोटरच्या नांगरटीसाठी एकरी 4 हजार 800 रुपये माजावे लागणार आहेत. दरवाढीचा भुर्दंड शेतकर्‍यांच्या मानगुटीवरच आहे. तसेच, छोट्या-मोठ्या वाहतुकीसाठी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. त्याचेही दर अंतरानुसार वाढविले जाणार असल्याचे ट्रॅक्टर चालकांनी सांगितले.

डिझेलची दरवाढ झाल्याने शेतीमशागत आणि पिकांच्या मळणीसाठीचे दरदेखील वाढले आहेत. यांत्रिकरणामुळे पारंपरिक मशागत मागे पडली. झटपट मशागत करून पेरणी करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढल्याने ट्रॅक्टर, पॉवर ट्रिलर यांना डिमांड आले. हे जरी खरे असले तरी रब्बीचा हंगाम तोंडावर आला आहे. त्यातच डिझेलच्या दरवाढीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

भाज्यांचेही दर भडकले

कोल्हापूर : डिझेल दरवाढीचा परिणाम फळभाजी बाजारपेठेवर दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्रासह अन्य राज्यातील मोठ्या प्रमाणात भाजीपाला येतो. चार ते पाच रुपये मिळणारी भाजीची पेंडी दहा ते पंधरा रुपये झाली आहे. डिझेल वाढल्यामुळेच वाहतुकीची दरवाढ करावी लागत असल्याचे ट्रक आणि टेम्पो धारकांनी सांगितले. जोपर्यंत डिझेलचे दर कमी होत नाहीत तोपर्यंत ही दरवाढ कायम राहील, असेही फळ व पालेभाज्या वाहतूक करणार्‍या वाहनधारकांनी सांगितले.

Back to top button