Shahu Maharaj : माहितीपटांतून राजर्षी शाहूंना मानवंदना | पुढारी

Shahu Maharaj : माहितीपटांतून राजर्षी शाहूंना मानवंदना

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : 18 मे हा दिवस ‘जागतिक संग्रहालय दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिनाच्या निमित्ताने दैनिक ‘पुढारी’ प्रयोग सोशल फाऊंडेशन, पुरातत्त्व वस्तुसंग्रहालय विभाग, महाराष्ट्र शासनाचे कोल्हापूर वस्तुसंग्रहालय, कोल्हापूर व पत्रकारिता व जनसंवाद अधिविभाग, शिवाजी विद्यापीठ यांच्या वतीने राजर्षी शाहू महाराजांचा जीवनपट उलगडणार्‍या माहितीपटांचे सादरीकरण करण्यात आले. राजर्षी शाहू जन्मस्थळ लक्ष्मी विलास पॅलेस येथे हा उपक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत घेण्यात आला. (Shahu Maharaj)

माहितीपटांमध्ये कोल्हापूर-मिरज रेल्वे, साठमारी, मोतीबाग तालीम, कोल्हापुरातील वसतिगृहे, लक्ष्मी विलास पॅलेस, केशवराव भोसले नाट्यगृह, न्यू पॅलेस, सी.पी.आर. हॉस्पिटल, प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस, रंकाळा तलाव, मुस्लिम बोर्डिंग, जोतिबा मंदिर – वाडी रत्नागिरी, शिवतीर्थ पॅलेस (रायबाग) या वारसा स्थळांबरोबरच देवदासी प्रथा निर्मूलन, इंदुमती राणीसाहेब, फासेपारधी समाज, बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराजांचा ऋणानुबंध, वेदोक्त प्रकरण, राजर्षी शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटना, राजर्षी शाहू महाराजांचा पर्यावरणीय द़ृष्टिकोन या विषयांचा समावेश आहे. माहितीपट निर्मिती करणार्‍या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. (Shahu Maharaj)

यावेळी इतिहास अभ्यासक प्राचार्य जे. के. पवार, आदित्य माने, अर्चना शिंदे, पत्रकारिता विभागाच्या सुमेधा साळुंखे, परशुराम पोवार, विहानचे संजय साऊळ, बाबा राजेमहाडिक, करुणालयचे आनंद बनछोडे उपस्थित होते. पुरातत्त्वचे सहायक अभिरक्षक उदय सुर्वे यांनी प्रास्ताविक केले.

उद्यान अधीक्षक उत्तम कांबळे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विक्रम रेपे यांनी केले.उपक्रमासाठी पुराभिलेख अधिकारी गणेशकुमार खोडके, प्रा. डॉ. निशा पवार यांचे सहकार्य लाभले.

सामाजिक संस्थांची संग्रहालय भेट

कोल्हापूर वस्तुसंग्रहालय-टाऊन हॉल, चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय, लक्ष्मी विलास पॅलेस – राजर्षी शाहू जन्मस्थळ या संग्रहालयांना विविध निमंत्रित सामाजिक संस्थांनी भेट दिली. वस्तुसंग्रहालय दिनानिमित्त सर्वांना मोफत प्रवेश देण्यात आला.

हेही वाचा; 

Back to top button