Kolhapur tourism : कोल्हापूरच्या समृद्ध पर्यटनाची क्षमता उमगणार तरी केव्हा?, विकासाच्या रेघोट्या केवळ कागदावर | पुढारी

Kolhapur tourism : कोल्हापूरच्या समृद्ध पर्यटनाची क्षमता उमगणार तरी केव्हा?, विकासाच्या रेघोट्या केवळ कागदावर

कोल्हापूर, राजेंद्र जोशी : दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोल्हापुरातील प्राचीन अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेण्यासाठी येणार्‍या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर पादत्राणे ठेवण्यासाठी सुरक्षित व्यवस्था नाही, म्हणून भाविक निवासाच्या ठिकाणीच आपली पादत्राणे ठेवतात आणि कडाक्याच्या उन्हाचेे चटके सहन होत नसल्याने रस्त्यावरून उड्या मारत मंदिरात प्रवेश करतात. वृद्धांचे हाल तर बघवत नाहीत आणि स्वच्छतागृहांचा तर पत्ताच नाही. वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था अपुरी असल्याने कोणी भाविक कुटुंबाने रस्त्याच्या कडेला मोकळी जागा दिसताच गाडी पार्क केली, तर आडोशाला दडलेले पोलिस एक तर पावत्या फाडण्यासाठी टपून बसलेले असतात, नाहीतर गाडी उचलून नेली जाते आणि भांबावलेले भाविक गाडीची शोधाशोध सुरू करतात.

कोल्हापुरात हा अनुभव नित्याचाच झाला आहे. या सर्व सुविधांसाठी भाविकांची पैसे मोजण्याची तयारी आहे. पण आम्ही मोफत सेवेच्या भावनेत अडकल्यामुळे सुविधाही नाहीत आणि महसूलही नाही, अशी अवस्था आहे. खरे तर या तीर्थक्षेत्राच्या पर्यटनामध्ये शेकडो कोटींच्या उलाढालीची क्षमता आहे. पण ही क्षमता आमच्या जाणत्या राजकारण्यांना आणि प्रशासनाला उमगणार कधी, हाच कळीचा मुद्दा आहे. कारण कोल्हापूरच्या विकासाचे एक मोठे स्वप्न त्यामध्ये अडकले आहे.

कोल्हापूर हा राज्याच्या नकाशावर दक्षिण टोकावरील एक प्रमुख पर्यटनाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यात पर्यटन इतके समृद्ध, की त्याची क्षमता ओळखण्यााठी द़ृष्टीचीच आवश्यकता आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांना आकर्षित करणारी खिद्रापूरची लेणी याच जिल्ह्यात आहेत. सह्याद्रीच्या कुशीमध्ये छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि पराक्रमी इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गडकोट किल्ल्यांची मालिकाही जशी या जिल्ह्यात आहे, तसे दक्षिण भारताची कुलस्वामिनी असलेल्या अंबाबाईचे प्राचीन मंदिर आणि दख्खनचा राजा जोतिबाचे निवासस्थानही याच जिल्ह्यात आहे.

मोठ्या धरणांची मालिका असो, वा गव्यांसाठी प्रसिद्ध अभयारण्य असो, हिरव्यागार वनराईच्या कुशीमध्ये लपेटलेल्या या जिल्ह्यामध्ये पर्यटकांना खेचून आणण्याची मोठी क्षमता आहे. पण या पर्यटन स्थळांच्या विकासाच्या घोषणा होतात, कागदावर आराखड्याच्या रेघोट्या मारल्या जातात, निवडणुकांचे फड गाजविले जातात आणि विकासाची योजना जाहीर होताच बाह्या सरसावून, विरोध करण्यासाठी मोर्चेकरीही रस्त्यावर येतात. कोल्हापूरचे हे दुष्टचक्र भेदणार कोण, असा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यासाठी एक सक्षम सर्वसमावेशक नेतृत्व पुढे येण्याची गरज आहे. पण सध्या तरी बहुसंख्यांना आपला मतदारसंघ सांभाळण्याची घाई आहे, तर काहींना या विकासाचे सोयरही नाही आणि सुतकही नाही, अशी अवस्था आहे.

Back to top button