कोल्हापूर : पंचगंगेत बुडणार्‍या 4 महिलांना जीवदान | पुढारी

कोल्हापूर : पंचगंगेत बुडणार्‍या 4 महिलांना जीवदान

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : आंघोळीसाठी पंचगंगा नदी घाटाच्या पायरीवरून पाय घसरून पडून पाण्यात गटांगळ्या खाणार्‍या लातूर जिल्ह्यातील चार महिलांना जीव रक्षकांच्या सतर्कतेमुळे जीवदान मिळाले. शनिवारी सकाळी ही घटना घडली. त्यापैकी माधुरी दत्ता आंबाडे (वय 35, रा. आरणे, जि. लातूर) यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मृत्यूच्या तावडीतून सुटका झालेल्यांमध्ये माधुरी आंबाडेसह कोमल सुरेश क्षीरसागर (वय 45), शामल राजकुमार क्षीरसागर (50), मंगल सुरेश मगर (45, रा. लातूर) यांचा समावेश आहे. लातूर येथील क्षीरसागर कुटुंबीय नातेवाईकांसमवेत जोतिबा व अंबाबाई दर्शनासाठी शनिवारी पहाटे कोल्हापुरात आले होते. पंचगंगा नदीत स्नान करून अंबाबाईचे दर्शन घेण्याचे त्यांनी ठरवले.

डोळ्यादेखत चौघीही बुडत होत्या

सकाळी साडेसहाला क्षीरसागर कुटुंबीयातील 9 जण स्नानासाठी पंचगंगेवर गेले. माधुरीसह अन्य तीन महिला नदीकाठावरील पायर्‍यांवर स्नान करीत होत्या. माधुरी यांचा पाय घसरल्याने त्या खोलवर पाण्यात पडल्या. बुडत असणार्‍या माधुरी यांना वाचविण्यासाठी कोमल क्षीरसागर सरसावल्या. त्याही तोल जाऊन पाण्यात पडल्या. पाठोपाठ त्या दोघींना वाचविण्यासाठी पाण्यात उतरलेल्या शामल क्षीरसागर व मंगल मगर याही बुडू लागल्या.

डोळ्यादेखत चारही महिला खोल पाण्यात पडल्याने नागरिकांनी आरडा ओरड केली. जीवरक्षक उदय निंबाळकर यांच्यासह विनायक जाधव, अजिज शेख घाटावर व्यायाम करीत असताना त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला.

जीवरक्षकांचीही दमछाक

स्वत:च्या जीवाची पर्वा न करता निंबाळकरसह जाधव व शेख यांनी नदीत उड्या टाकल्या. निंबाळकर यांनी पाण्यात गटांगळ्या खाणार्‍या माधुरी आंबाडे यांना पाण्यातून बाहेर काढले. पाठोपाठ कोमल यांच्यासह अन्य दोन महिलांना पाण्यातून बाहेर काढताना निंबाळकरसह तिघांचीही दमछाक होऊ लागली.

गाभीर्याने परिस्थिती हाताळली

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन निंबाळकर यांनी शेख यांना तातडीने काठावर जाऊन रबरी ट्यूब पाण्यात टाकण्याची सूचना केली. ही ट्यूब पाण्यात टाकताच उदय निंबाळकर व जाधव यांनी पाण्यात गटांगळ्या खाणार्‍या तिघींना ट्यूबचा आधार देत बाहेर काढले.

जीवरक्षकांची सतर्कता

माधुरीसह कोमल यांना उलट्या होऊ लागल्याने त्यांना तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यापैकी माधुरी आंबाडे यांची प्रकृती अत्यवस्थ बनल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. जीवरक्षक उदय निंबाळकरसह जाधव व शेख यांच्या सतर्कतेमुळे चारही महिलांना जीवदान मिळाले.

Back to top button