कोल्हापूर : कोपेश्वर मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरच | पुढारी

कोल्हापूर : कोपेश्वर मंदिराचे स्ट्रक्चरल ऑडिट लवकरच

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाच्या संचालक शुभा मुजुमदार यांनी दिली आहे. दै. ‘पुढारी’ने सातत्याने रेटा लावून या विषयाचा पाठपुरावा केल्यामुळे लवकरच मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत.

2019 आणि 2021 साली कृष्णा नदीला आलेल्या महापुरांमुळे शिल्पकलेचा वैभवशाली जगप्रसिद्ध ठेवा असलेल्या या मंदिराचे अपरिमित नुकसान झालेले आहे. मंदिराला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. मंदिराचे मुख्य आकर्षण असलेल्या स्वर्गमंडपाच्या 20 खांबांना भेगा पडल्या आहेत. त्यापैकी 6 खांब हळूहळू बाहेरच्या बाजूस झुकत चालले असून, त्यामुळे स्वर्गमंडप कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. याबाबत दै. ‘पुढारी’ने 19 मार्च 2022 रोजी सविस्तर वृत्तमालिका प्रसिद्ध करून मंदिराला निर्माण झालेला धोका शासनाच्या आणि पुरातत्त्व खात्याच्या निदर्शनास आणून दिला होता. पुरातत्त्व खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनीही या वृत्ताला त्यावेळी दुजोरा दिला होता. दै. ‘पुढारी’ने हे मंदिर वाचविण्यासाठी काय काय करता येईल, त्याबाबतच्या उपाययोजनाही सुचविलेल्या होत्या.

कृष्णा नदीच्या कुशीत काळ्या कातळातून सुमारे 1,600 वर्षांपूर्वी साकारलेले हे शिल्पवैभव उभे आहे. जवळपास 7 राजवयींचा साक्षीदार असलेले हे मंदिर म्हणजे एक ऐतिहासिक ठेवा आहे. त्यामुळे तत्कालीन महाविकास आघाडी शासनाने या वृत्ताची तातडीने दखल घेऊन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्याची घोषणा केली होती.

गेल्या काही दिवसांत तर मंदिराची अवस्था आणखीनच दयनीय होताना दिसत आहे. अगदी छोटासा पाऊस झाला, तरी मंदिराच्या भिंती पाझरू लागतात. मंदिराच्या भिंतींत पाणी मुरू लागते, स्वर्गमंडपाचे खांब कलण्याची प्रक्रिया तर धिम्यागतीने सुरूच आहे. त्यामुळे एकादा मोठा पाऊस झाल्यास किंवा येत्या पावसाळ्यात या मंदिराला निर्णायक धोका निर्माण होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. आजकाल तर मंदिराचे पुजारी आणि पर्यटकांनाही या मंदिरात जायला भीती वाटू लागलेली दिसून येत आहे. तशातच यंदा जर महापूर आलाच, तर मंदिराचे काय होईल ते सांगता येत नाही, अशी भीती व्यक्त करण्यात येत असल्याची बाबही दै. ‘पुढारी’ने नुकतीच शासनाच्या आणि पुरातत्त्व विभागाच्या निदर्शनास आणून दिली होती.

याबाबत पुरातत्त्व खात्याच्या संचालक शुभा मुजुमदार यांनी आज (बुधवारी) अशी माहिती दिली आहे की, या मंदिराच्या जीर्णोद्धाराबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडून आपल्याकडे आलेला आहे. मात्र, त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आले आहे. या त्रुटी दूर करून येत्या आठ दिवसांत याबाबत बैठक घेण्यात येणार आहे. त्यानंतर लवकरच मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर मंदिराच्या नेमक्या कोणकोणत्या भागांना आणि किती प्रमाणात धोका पोहोचला आहे, ते स्पष्ट होईल. त्यानंतर प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

Back to top button