कोल्‍हापूर : खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात भाविकांनी अनुभवला शून्य सावलीचा आविष्कार (पाहा फाेटाे) | पुढारी

कोल्‍हापूर : खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिरात भाविकांनी अनुभवला शून्य सावलीचा आविष्कार (पाहा फाेटाे)

कुरुंदवाड : जमीर पठाण खिद्रापूर (ता शिरोळ) कोपेश्वर मंदिरातील स्वर्गमंडप आणि त्याच्या ओळंबा रेषेत खाली असणारी रंगशिळा येथे आज (शुक्रवार) शून्य सावलीचा आविष्कार पहायला मिळाला. त्याचबरोबर सकाळी सूर्योदयावेळी 6 वाजून 28 मिनिटांनी किरणोत्सवही झाला. मंदिराच्या गाभा-यातील शिवलिंगावर सूर्य किरणांनी अभिषेक केला. हा सुंदर भौमितिक आणि खगोलीय अविष्कार पर्यटकांना अनूभवायला मिळाला.

दैनिक पुढारीने “सावली सोडणार, आज उद्या साथ” खिद्रापूर कोपेश्वर मंदिरात शून्य सावलीचा अविष्कार अनुभवायला मिळणार असे वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटकांची हा अविष्कार पाहण्यासाठी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

सूर्याचा उत्तरायण आणि दक्षिणायन असा भासमान मार्ग पृथ्वीच्या 23.50 अक्षांश दक्षिण आणि उत्तरेकडे असतो. म्हणजेच कर्कवृत्त आणि मकरवृत्त ह्या दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागावर सूर्य वर्षांतून दोनदा दुपारी डोक्यावर येतो आणि दोनदा शून्य सावली दिवस येतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील कोनीय व्यास आणि अंशात्मक अंतर जिथे जुळते, तिथे शून्य सावली दिवस घडतो.

शिरोळ तालुक्यातील खिद्रापूर मंदिराला पश्चिम महाराष्ट्रातील पर्यटन तसेच धार्मिक दृष्‍ट्या अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे मंदिर पुरातन असल्याने याची अनेक वैशिष्ट्यपूर्ण रचना आहेत. शून्य सावली ही खगोलशास्त्रीय घटना आहे. प्रत्येक वर्षी 2 वेळा ही घटना घडत असते. सूर्य मध्यान्हाच्या स्थितीत येतो, तेव्हा सूर्याची लंबरुप किरणे पडतात. अशावेळी शून्य सावलीचा अनुभव घेता येतो.

खिद्रापूर कोपेश्वर मंदिर येथे आज शनिवार दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी शून्य सावलीचा अनुभव अनेकांनी अनुभवला. उत्तरेतील कर्कवृत्तापर्यंत दि. 21 जून पर्यंत व दक्षिणेस मकरवृत्तापर्यंत दि. 22 डिसेंबर पर्यंत चालते. शून्य सावलीचा अनुभव शिरोळ भागात 12:25 ते 12:26 या काळात अनुभवता आला. आजपासून 30 किलोमीटर उत्तरेला म्हणजेच कोल्हापूर, जयसिंगपूर, सांगली या पट्ट्यात 12 : 25 वाजता 45 सेकंद शून्य सावली अनुभवता येणार आहे.

खिद्रापूर कोपेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात शून्य सावली अनुभवण्यासाठी इतर प्रयोगसाधनेही या रंगशिळेवर दत्तवाड येथील विज्ञानशिक्षक भारत सावळवाडे यांनी मांडली होती. त्‍यामुळे भाविकांना हा अविष्कार पाहणे अत्यंत सोईस्कर झाले आणि शून्य सावलीचा अनुभव घेता आला. शून्य सावली अनुभवण्यासाठी जिल्ह्यातील पर्यटकांनी मंदिरात मोठी गर्दी केली होती.

हेही वाचा :  

Back to top button