Palghar News | आईच्या डोकीवरचे ओझे हलके करण्यासाठी १५ वर्षाच्या मुलाने स्वतः खोदली विहीर | पुढारी

Palghar News | आईच्या डोकीवरचे ओझे हलके करण्यासाठी १५ वर्षाच्या मुलाने स्वतः खोदली विहीर

सफाळे: प्रमोद पाटील : सध्या तीव्र उन्हाळा सुरू असून या उन्हाळ्यामध्ये काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण होते. परिणामी दूरवरून पाण्यासाठी भटकंती करावी लागते. ही परिस्थिती पाहून केळवे येथील धावंगेपाड्यामध्ये (Palghar News)  राहणाऱ्या एका पंधरा वर्षाच्या मुलाने स्वतः हातात पहार आणि टिकाऊ घेऊन १५ ते १६ फूट विहीर खोदली. आणि आईच्या डोकीवरचा भार हलका करत पाण्याची समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला.

ही विहीर खोदणाऱ्या मुलाचे नाव प्रणय रमेश सालकर असून तो येथील आदर्श विद्यालय केळवे (Palghar News) या विद्यालयात इयत्ता नववीच्या वर्गात शिकत आहे. आपल्या आईला दूरवरून पाणी आणावे लागत असल्याची बाब या शाळकरी मुलाच्या लक्षात आली. त्यानंतर तळपत्या उन्हात कशाचीही पर्वा न करता स्वतःच्या हिंमत आणि जिद्दीने चार ते पाच दिवसांत जवळजवळ अठरा ते वीस फूट विहीर त्याने आपल्या घराजवळच खोदली. या विहिरीला चांगलं गोड पाणी लागले आहे. भर उन्हामध्ये आईला पाणी आणण्यासाठी त्रास होऊ नये, म्हणून त्यांने ही विहीर खोदण्याचे अत्यंत खडतर असे काम केले आहे. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Palghar News : पालघर जिल्हा परिषदेकडून प्रणयच्या वडिलांना घरकूल मंजूर

प्रणय सालकरच्या या विहिरीचे ‘दैनिक पुढारी’ मध्ये वृत्त बुधवारी (दि. ३) प्रसिद्ध होताच पालघर जिल्हा परिषदेतर्फे प्रणयचा स्थायी समिती सभेदरम्यान सत्कार करण्यात आला. तसेच पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी प्रणय यास रोख ११ हजार रुपयांचे बक्षीस दिले. त्याचबरोबर आवास योजनेमधून प्रणयच्या वडिलांना तत्काळ घरकुल मंजूर करून देण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपाध्यक्ष पंकज कोरे, सर्व समिती सभापती, स्थायी समिती सदस्य, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आदीसह विभाग प्रमुख उपस्थित होते. तसेच केळवे ग्रामपंचायतचे सरपंच संदीप किणी यांनी घटनास्थळी जाऊन त्या मुलाचे अभिनंदन केले.

प्रणय हा आजच्या युगातील श्रावणबाळ आहे. याबद्दल त्याचे कौतुक आहे. परंतु पाण्यासाठी कुठल्या मुलाला अशी विहीर खणावी लागू नये. २०२४ पर्यंत जिल्ह्यातील प्रत्येक घरात नळाद्वारे पाण्याचा पुरवठा करण्यात येईल, अशी ग्वाही मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून देतो,

– प्रकाश निकम, अध्यक्ष, जिल्हा परिषद, पालघर

प्रणय सालकर या शालकरी मुलाने सुमारे 15 फूट आणि 2.5 व्यासाची विहीर सर्वांच्या कुतूहलाचा विषय बनली आहे. प्रणय एक अभ्यासू आणि कष्टाळू विद्यार्थी आहे.

– हेमंत गोसावी, शिक्षक

आता मला सुट्टी लागली आहे. सुटीमध्ये काहीतरी करावे, म्हणून विहीर खोदण्याचा मी प्रयत्न केला. मला काम करायला खूप आवडते. सुटीत मी नेहमी आईसोबत वाडीत काम करतो आणि अभ्यासही करतो.

– प्रणय सालकर, विद्यार्थी.

हेही वाचा 

Back to top button