तूर, नाचणी, भुईमूग शेंगा बियाणे अनुदानावर मिळणार | पुढारी

तूर, नाचणी, भुईमूग शेंगा बियाणे अनुदानावर मिळणार

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  खरिपाच्या हंगामाच्या तोंडावर महाबीजने शेतकर्‍यांना तूर, नाचणी, मूग, उडीद, नाचणी, भुईमूग शेंगा ही बियाणे अनुदानावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना प्रमाणित बियाणे मिळणार आहेत. 15 मे पर्यंत ही बियाणे शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्याचे नियोजन महाबीजने केले आहे.

यापूर्वी शेतकर्‍यांना बियाणे उपलब्ध करून देण्यास असमर्थ ठरलेल्या महाबीजने आतापासून बियाणे उपलब्ध करून देण्यासाठी कंबर कसली आहे. या संदर्भात विक्रेत्यांची आढावा बैठक झाली. यावेळी महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे यांच्या अन्य अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे शेतकर्‍यांना प्रमाणिकरण केलेले भाताचे बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशा सूचना कलंत्रे यांनी केल्या.

सध्या जिल्ह्यात भात पिकाचे एकूण 1 हजार 40 क्विंटल बियाणे उपलब्ध आहे. शासनाकडून तूर, मूग, उडीद, नाचणी, भुईमूग शेंगा ही बियाणे शेतकर्‍यांना अनुदानावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, अधिकारी व विक्रेत्यांनी याची माहिती गावपातळीवर शेतकर्‍यांना देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना केल्या. महाबीजची ताग व चारावर्णीय पिकांचे बियाणे यांची माहिती या बैठकीत देण्यात आली, त्याचाही लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा. यावेळी विभागीय व्यवस्थापक एन. जी. ईनामदार व अधिकारी उपस्थित होते.

तक्रार निवारण कक्ष सुरू

जिल्ह्यातील शेतकर्‍यांना बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांच्या खरेदी व विक्रीबाबतच्या तक्रारी दूर करण्यासाठी कृषी विभागाकडून ठोस कारवाई करण्याच्या उद्देशाने तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. शेतकर्‍यांना कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी जिल्हास्तरावरील तक्रार निवारण कक्षात तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर यांनी केले आहे.

खरीप हंगामासाठी शेतक-यांकडून बी-बियाणे, खते, कीटकनाशके यांची खरेदी सुरू आहे. अशावेळी वितरकांकडून खते, बियाणे, कीटकनाशके यांची विक्री जादा दराने होऊ शकते. माल असूनही त्याची कृत्रिम टंचाई तयार केली जाऊ शकते. त्यामुळे यासंदर्भातील शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणी दूर करण्यात येणार आहेत.

Back to top button